मूलभूत सोयी सुविधा द्या; मुकुंदनगर-राजनगरच्या नागरिकांचा मनपावर प्रवेशद्वारावर ठिय्या
By मुजीब देवणीकर | Published: November 15, 2022 06:56 PM2022-11-15T18:56:08+5:302022-11-15T18:56:45+5:30
मुकुंदनगर-राजनगर येथील लोकसंख्या बरीच वाढली आहे. महापालिकेने या भागातील वसाहतींना कोणत्याही मूलभूत सोयीसुविधा दिलेल्या नाहीत.
औरंगाबाद : मुकुंदवाडी रेल्वे रुळाजवळील मुकुंदनगर- राजनगर भागात राहणाऱ्या नागरिकांनी मंगळवारी महापालिकेवर हल्लाबोल केला. प्रवेशद्वारावर सव्वादोन तास ठिय्या आंदोलन केले. प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले. प्रश्न मार्गी न लागल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
मुकुंदनगर-राजनगर येथील लोकसंख्या बरीच वाढली आहे. महापालिकेने या भागातील वसाहतींना कोणत्याही मूलभूत सोयीसुविधा दिलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना बाराही महिने अक्षरश: नरकयातनाच सहन कराव्या लागतात. त्रस्त नागरिकांनी नागरी कृती समितीमार्फत आमखास मैदान ते मनपापर्यंत मोर्चा काढला. गुंठेवारी अंतर्गत मोडणाऱ्या या वॉर्डात मनपाने कोणत्याच सोयी सुविधा दिल्या नाहीत. दरवर्षी पावसाळ्यात चिखलात ये-जा करावी लागते. कोणत्याही आरोग्य सुविधा नाहीत. पथदिवे, ड्रेनेज व्यवस्था नाही. पादचारी महिला नाल्याच्या पाण्यात वाहून गेली, रुळावर अनेक अपघात झाले. काही नागरिकांना जीव गमवावा लागला. रस्ता नसल्याने अंत्यविधीसाठी वाहन येत नाही. गॅस सिलिंडर घरपोच मिळत नाही. मोर्चात वॉर्डातील महिला, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांना निवेदन दिले.
नागरी कृती समितीच्या प्रमुख मागण्या
रेल्वे गेट नंबर ५६ ते बाळापूर फाटापर्यंत सिमेंट रस्ता करण्यात यावा. अंतर्गत रस्ते गुळगुळीत करावेत. भुयारी मार्ग करावा. ड्रेनेजलाईन टाकावी. सार्वजनिक पाणीपुरवठा योजना सुरू करावी. वाढत्या चोऱ्या व अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस चौकी स्थापन करावी. रेल्वे पटरी लगत दक्षिण बाजूला रोड बांधण्यात यावा. पथदिवे लावण्यात यावेत. स्मशानभूमी बांधावी. चुकीच्या पद्धतीने लावलेला कर रद्द करावा.