अगोदर सुरक्षा सुविधा द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:04 AM2021-03-20T04:04:17+5:302021-03-20T04:04:17+5:30
औरंगाबाद : कोरोना महामारीमध्ये शिक्षकांवर अतिरिक्त कामाची जबाबदारी टाकण्यात आली आहे; मात्र कोरोना सर्वेक्षणासाठी आधी सुरक्षा साधणे द्या. त्यानंतर ...
औरंगाबाद : कोरोना महामारीमध्ये शिक्षकांवर अतिरिक्त कामाची जबाबदारी टाकण्यात आली आहे; मात्र कोरोना सर्वेक्षणासाठी आधी सुरक्षा साधणे द्या. त्यानंतर सर्वेक्षण करू, अशी भूमिका प्राथमिक शिक्षक संघाने घेतली आहे. याविषयीचे निवेदन पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला सादर केले.
शिक्षकांनी घरोघरी जाऊन कुटुंब सर्वेक्षण करणे, चौका-चौकात वाहन तपासणी करणे, स्वस्त धान्य दुकानावर पर्यवेक्षण करणे, कोविड सेंटरवर चौकशी अधिकारी अशा विविध कामांसाठी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे; परंतु या कामासाठी आवश्यक असणारे विमासुरक्षा कवच इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांना शासनाकडून दिल्या गेले नाही. सॅनिटायझर, मास्क, पीपीटी किट तसेच इतर आवश्यक साहित्यसुद्धा पुरविल्या जात नाही. गेल्या वर्षभरात सदरील कामावर कर्तव्य बजावताना अनेक शिक्षकांचा जीव गेला आहे; परंतु संबंधितांच्या कुटुंबीयांना विम्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे अनेक कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढवले आहे, असे निवेदनात म्हटले आहे. प्राथमिक शिक्षक संघाचे संपर्कप्रमुख मधुकर वालतुरे, राजेश हिवाळे, काकासाहेब जगताप, कैलास गायकवाड, जे. के. चव्हाण आदींची यावेळी उपस्थिती होती.