शाळांमध्ये पाण्याच्या सुविधा उपलब्ध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:07 PM2019-05-20T23:07:57+5:302019-05-20T23:08:39+5:30
मराठवाड्यासह राज्यभरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. या दुष्काळाचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये, यासाठी प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश शासनाकडून शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांना देण्यात आले आहेत.
औरंगाबाद : मराठवाड्यासह राज्यभरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. या दुष्काळाचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये, यासाठी प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश शासनाकडून शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांना देण्यात आले आहेत.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, पंचायत समिती यासह खासगी, अनुदानित, अंशत: अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतर पाणीटंचाईच्या समस्येला विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागेल अशी परिस्थिती आहे. यावर विविध उपाययोजना राबविण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या स्तरावरून संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन व साह्य उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. यासाठी शिक्षण आयुक्त, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या शिक्षण संचालकांना महत्त्वाची भूमिका बजवावी लागणार आहे. याविषयीचे आदेश शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव स्वा. म. नानल यांनी काढले आहेत. कार्यवाहीचा आढावा घेऊन शासनाकडे अहवाल पाठविण्याची जबाबदारीही याच अधिकाºयांवर सोपविण्यात आलेली आहे.
-----------