सिटी स्कॅनसाठी घाटीला ५.५ कोटींची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 12:44 AM2018-02-06T00:44:37+5:302018-02-06T00:44:42+5:30
घाटी रुग्णालयाला नवीन सिटी स्कॅन मिळण्यासाठी अर्थमंत्र्यांनी ५.५ कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा केली, तर शिर्डी संस्थानकडून एमआरआय मशीन मिळवून दिले जाईल, असे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : घाटी रुग्णालयाला नवीन सिटी स्कॅन मिळण्यासाठी अर्थमंत्र्यांनी ५.५ कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा केली, तर शिर्डी संस्थानकडून एमआरआय मशीन मिळवून दिले जाईल, असे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. त्यामुळे घाटीत सिटी स्कॅन आणि ‘एमआरआय’च्या सुविधेत भर पडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
घाटीत ६४ स्लाईड आणि ६ स्लाईड अशी दोन सिटी स्कॅन यंत्रे आहेत. या यंत्रामुळे गोरगरीब रुग्णांना दिलासा मिळत आहे; परंतु या यंत्रांना अनेक वर्ष झाल्याने ती वारंवार नादुरुस्त होतात. त्यामुळे नवीन सिटी स्कॅनसह एमआरआय मशीन मिळण्याची मागणी घाटी प्रशासनाने केली. त्यासंदर्भात शासनाला प्रस्ताव दिला. शहरात सोमवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ५.५ कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा केली. त्यामुळे आगामी काही दिवसांत घाटीत नवीन सिटी स्कॅन दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला. २० कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. यामध्ये सिटी स्कॅनसाठी ५.५ कोटी रुपये देण्यात येईल, असे सांगितले. हा निधी २०१८-१९ मध्ये मिळू शकेल,असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या.
दंत महाविद्यालयास हवा निधी
शासकीय दंत महाविद्यालयाच्या नव्या वसतिगृहातील फर्निचर आणि विद्युतीकरणासाठी २ कोटींचा निधी देण्याचे आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिल्याचे अधिष्ठाता डॉ. एस. पी. डांगे यांनी सांगितले. दीड वर्षांपूर्वी जुन्या वसतिगृहाच्या पुनर्वापरासाठी २० कोटींचा प्रस्ताव शासनाला दिला आहे. महाविद्यालयाच्या इमारतीत व्हीआरएफ कुलिंग यंत्रणेसाठी ५.५ कोटींची मागणी केल्याचे डॉ. डांगे म्हणाले.