फौजदार कर्तव्य विसरले; सह आरोपी न करण्यासाठी ५० हजाराची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 11:59 AM2020-10-22T11:59:22+5:302020-10-22T13:20:45+5:30
काही दिवसांपूर्वी तक्रारदार यांच्या दुकानावर छापा टाकून पोलीस आणि अन्न व औषधी प्रशासन विभागाने सुगंधी तंबाखू आणि प्रतिबंधित गुटखा जप्त केला होता.
औरंगाबाद : गुटखा विक्री प्रकरणात तक्रारदार व्यापाऱ्याला सहआरोपी न करण्यासाठी ५० हजार रुपये लाच घेताना सिटी चौक पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी मध्यरात्री करण्यात आली. संतोष रामदास पाटे असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक ब्रह्मदेव गावडे यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी तक्रारदार यांच्या दुकानावर छापा टाकून पोलीस आणि अन्न व औषधी प्रशासन विभागाने सुगंधी तंबाखू आणि प्रतिबंधित गुटखा जप्त केला होता. याविषयी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटे करीत होते. याप्रकरणी तक्रारदार यांना सह आरोपी न करण्यासाठी फौजदार पाटे यांनी त्यांच्याकडे ५० हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार नोंदविली.
पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर अधीक्षक डॉ. अनिता जमादार , उपाधीक्षक ब्रह्मदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप राजपूत आणि कर्मचाऱ्यांनी बुधवारी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. यात आरोपी फौजदार पाटे ने ५० हजार रुपयांची पंचासमक्ष मागणी करून ही रक्कम रात्री आणून देण्यास सांगितले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाटेला पकडण्यासाठी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे सिटी चौक परिसरात तक्रारदार यांच्याकडून ५० हजार रुपये लाच घेताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी झडप टाकून पाटेला लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले. या कारवाईने शहर पोलिस दलात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सिटीजन ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.