घाटीत घडणार मनोचिकित्सक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 05:32 PM2019-01-13T17:32:37+5:302019-01-13T17:32:54+5:30
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी)‘मनोविकृती’मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याची तयारी करण्यात येत आहे. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना याचा ...
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी)‘मनोविकृती’मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याची तयारी करण्यात येत आहे. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होईल आणि त्यातून मनोचिकित्सकतज्ज्ञ तयार होऊन मनोरुग्णांवरील उपचारात भर पडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
संपूर्ण जिल्ह्यात किंवा विभागीय पातळीवर शासकीय मनोरुग्णालय नाही. प्रादेशिक मनोरुग्णालयाची वर्षानुवर्षे प्रतीक्षाच करावी लागत आहे. गेली काही वर्षे घाटीतील मनोविकृती आंतररुग्ण विभाग बंद होता. त्यामुळे गोरगरीब मनोरुग्णांना खाजगी रुग्णालय अथवा पुण्याला जाऊन उपचार घ्यावे लागत होते; परंतु दीड वर्षांपूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) मनोविकृती विभागाचा आंतररुग्ण विभाग कार्यान्वित झाला. जिल्ह्यात गोरगरीब रुग्णांना हा एकमेव आसरा आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यासह लगतच्या भागातील मनोरुग्णांवर उपचार होत आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने ‘मनोविकृती’ पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याची तयारी केली आहे. मनोविकृती विभागामध्ये डॉ. संजीव सावजी यांची प्राध्यापक म्हणून शुक्रवारी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी हे पहिले पाऊल ठरले आहे. आगामी काही दिवसांत अर्ज प्रक्रिया, पाहणी आदी प्रक्रिया होतील. घाटी प्रशासनाने २०२० मध्ये हा अभ्यासक्रम सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
उर्वरित प्रक्रिया होतील
‘मनोविकृती’च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमामुळे मराठवाड्यातील विद्यार्थी तयार होतील. मनोचिकित्सक घडतील. सध्या प्राथमिक स्तरावर ही प्रक्रिया आहे. आगामी काही दिवसांत उर्वरित प्रक्रिया पार पाडल्या जातील, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.