‘पोटा पुरते देई विठ्ठला...लई नाही मागणे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:11 AM2017-08-15T00:11:58+5:302017-08-15T00:11:58+5:30
‘विविध घराण्यांतील ज्येष्ठ गुरूंकडून जे काही स्वरमोती मी घेऊ शकलो ते घेतले. सर्व रसिकांचे आशीर्वाद लाभले, हेच माझे भाग्य, अशा प्रांजळ भावना पं. नाथ नेरळकर यांनी व्यक्त केल्या. निमित्त होते त्यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त शिष्यांतर्फे करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्याचे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘विविध घराण्यांतील ज्येष्ठ गुरूंकडून जे काही स्वरमोती मी घेऊ शकलो ते घेतले. सर्व रसिकांचे आशीर्वाद लाभले, हेच माझे भाग्य, अशा प्रांजळ भावना पं. नाथ नेरळकर यांनी व्यक्त केल्या. निमित्त होते त्यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त शिष्यांतर्फे करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्याचे.
गोकुळाष्टमीचे औचित्य साधून पं. नेरळकरांच्या सन्मानार्थ सोमवारी (दि.१४) ‘नाद ब्रह्मोत्सव’ या शास्त्रीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या नाट्यगृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, कवी प्रा. फ. मुं. शिंदे आणि पं. विश्वनाथ ओक उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना नेरळकर म्हणाले, मला जरी नेमके घराणे नसले तरी गंमतीने माझ्या घराण्याला आम्ही नांदेडी घराणे म्हणतो. असेच हसत-खेळत वयाची शंभरीदेखील गाठेल, असा मला विश्वास आहे.
पं. विश्वनाथ ओक यांनी गौरवोद्गार काढताना म्हटले की, संगीतातील दहा रूपे नाथ नेरळकरांनी दाखविली. डॉ. भापकर म्हणाले, नाथरावांसारखे व्यक्तिमत्त्व आपल्या प्रदेशासाठी मोठे भूषण आहे. त्यांच्या योगदानामुळे येथे समृद्ध व संपन्न असे सांस्कृतिक वातावरण तयार झाले.