पथनाट्यातून सुरक्षिततेविषयी जनजागृती
By Admin | Published: January 18, 2016 12:23 AM2016-01-18T00:23:39+5:302016-01-18T00:23:39+5:30
बीड : महाराष्ट्र शासन, ऊर्जा व कामगार विभागाच्या वतीने महावितरणच्या बीड विभागात विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
बीड : महाराष्ट्र शासन, ऊर्जा व कामगार विभागाच्या वतीने महावितरणच्या बीड विभागात विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. शहरात उद्घाटन झालेल्या या सप्ताहाची सांगता परळी येथील औष्णिक विद्यत केंद्रात करण्यात आली. थर्मलबाबा विसरभोळे या पथनाट्यातून कामगारांच्या चुकांचे प्रात्याक्षिक दाखूवन कामाबाबत घ्यावयाची काळजी सादर करण्यात आली.
११ जानेवारीपासून सुरू झालेल्या या सप्ताहात कामगारांपासून ग्राहकांपर्यंत विद्युत सुरक्षेबाबत जागृती होण्यासाठी महावितरणकडून अनेक उपक्रम राबविण्यात आले. प्रभारी मुख्य अभियंता एल.बी. चौधरी यांनी सुरक्षेबाबत मंत्र सांगून सप्ताहाला सुरुवात केली होती. त्या अनुषंगाने अभियंते, लाईनमन यांनी मुख्य शहरांमधील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. एवढेच नाही तर, विद्यार्थ्यांना ध्वनिचित्रफीतही दाखविण्यात आली होती. सुरक्षिततेच्या अनुषंगाने शालेय निबंध स्पर्धा पार पडल्या. विविध मान्यवरांची व्याख्याने झाली.
१३ जानेवारी रोजी कर्मचाऱ्यांनी कामाबाबत मनोगत व्यक्त केले, तर विद्युत सुरक्षा या विषयावर आर.एस. आव्हाड, हंटकर, सुनील काळे, सय्यद शेख यांची व्याख्याने झाली. औद्योगिक विद्युत केंद्र, रायफले यांनी लिफ्टची विद्युत सुरक्षा, तर वनवे यांनी अग्निशामकबाबतची प्रात्यक्षिके सादर केली.
शनिवारी परळी येथील औष्णिक वीज केंद्रात संतोष चतुर्भूज दिग्दर्शित ‘थर्मलबाबा विसरभोळे’ या पथनाट्याचे सादरीकरण करून निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे वाटण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्य अभियंता एल.बी. चौधरी, विद्युत निरीक्षक आर.एस. काळे, ओसवाल, सर्वदे, कवडेकर, कार्यकारी अभियंता आव्हाड, सुरक्षा अधिकारी एच.डी. मैंदाड, चिपडे उपस्थित होते. एस.बी. उदार यांनी सूत्रसंचालन केले. कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)