जनजागृतीमुळे वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्यांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:04 AM2021-07-28T04:04:37+5:302021-07-28T04:04:37+5:30

औरंगाबाद : वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे अपघाताला निमंत्रण देण्यासारखेच आहे, याविषयी सतत जनजागृती केली जाते. शिवाय पोलिसांकडून अशा वाहनचालकांवर ...

Public awareness has reduced the number of mobile speakers while driving | जनजागृतीमुळे वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्यांची संख्या घटली

जनजागृतीमुळे वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्यांची संख्या घटली

googlenewsNext

औरंगाबाद : वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे अपघाताला निमंत्रण देण्यासारखेच आहे, याविषयी सतत जनजागृती केली जाते. शिवाय पोलिसांकडून अशा वाहनचालकांवर कारवाई होत असल्याने मोबाइलवर बोलत वाहन चालविताना अपघात होण्याचे प्रमाणही ९७ टक्क्यांपर्यंत घटल्याचे सूत्रांनी सांगितले. दरवर्षी शहरात रस्ते अपघातात सरासरी दीडशे लोकांचे बळी जातात. विनाहेल्मेट दुचाकी अपघातातील मृत्यूचे प्रमाण ७० टक्के असल्याचे सूत्रांनी सांगितले.

औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दरवर्षी सरासरी ५०० हून अधिक रस्ते अपघात होतात. यात १५० प्राणांतिक तर गंभीर अपघातांची संख्या २०० हून अधिक असते. उर्वरित अपघात किरकोळ स्वरूपाचे असतात. दरवर्षी रस्ते अपघातात सरासरी १५० हून अधिक नागरिकांचे बळी जातात. तर गंभीर जखमींची संख्या ३०० च्या आसपास असते. अपघातांना अनेक बाबी कारणीभूत आहेत. यापैकी वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे हे एक महत्त्वाचे कारण आहे. मोबाइलवर बोलत असताना वाहन चालविताना चालकाचे लक्ष विचलित होते आणि अपघाताचा धोका वाढतो. यामुळे वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा ठरविण्यात आला आहे. मोबाइलवर बोलत दुचाकी चालविणाऱ्या चालकांवर पोलीस दंडात्मक कारवाई करतात. यामुळे मोबाइलवर बोलत वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी मोबाइलमुळे अपघात होण्याचे प्रमाण तीन टक्केच असल्याचे सूत्रांनी सांगितले.

-------------------------

२०२० मध्ये शहरात झालेले अपघात

प्राणांतिक अपघात- ३५२

अपघातामधील जखमी- २५३

मृत्यू- १२१

-------------------------------------

वाहतूक नियम माेडणाऱ्या चालकांवर झालेली कारवाई आणि दंडाची रक्कम

वाहन चालविताना मोबाइलचा वापर करणे - ७ हजार २८८- १४ लाख ५७ हजार ६०० रुपये

विनाहेल्मेट - १५ हजार ४६८- ७७ लाख ३४ हजार रुपये

सिग्नल तोडणे - १८ हजार ५७७- ३७ लाख १५ हजार ४०० रुपये

------------------------

चौकट

हेल्मेट नसल्यामुळे गतवर्षी ३४ दुचाकीस्वार मुकले प्राणास

अपघातामधील मृत्यूविषयी सूत्रांनी सांगितले की, विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचा अपघात झाल्यास, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याच्या मृत्यूची शक्यता ७० टक्क्यांपर्यंत असते. २०२० मध्ये रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वाहनचालकांपैकी ३४ दुचाकीस्वारांचा हेल्मेट नसल्यामुळे मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

---------------------------

स्पीडगनद्वारेही सुसाट वाहनचालकांवर कारवाई

वाहनचालकांनी वेगमर्यादा न पाळल्यास अपघाताचा धोका वाढतो. ही बाब लक्षात घेऊन शहर पोलीस वाहतूक विभागाकडून दोन स्पीडगन यंत्रांद्वारे सुसाट वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते. या वर्षी मार्च ते जून या कालावधीत ५ हजार ८४६ सुसाट वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईंतर्गत त्यांना ५ लाख ४६ हजार ६०० रुपये दंड ठोठावण्यात आल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले. रस्ते अपघातातील मृत्यू रोखण्यासाठी प्रत्येक दुचाकीचालकांनी हेल्मेट घालणे कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. विनाहेल्मेट दुचाकीचालकांवर पोलीस आणि आरटीओ अधिकारी दंडात्मक कारवाई करतात.

Web Title: Public awareness has reduced the number of mobile speakers while driving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.