दुष्काळ निर्र्मूलनासाठी जनजागृती आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 11:49 PM2019-03-03T23:49:05+5:302019-03-03T23:49:14+5:30
राज्यातील जनता दुष्काळाने होरपळून निघत आहे, तरीही सरकार लक्ष देत नाही. दुष्काळ निर्मूलनासाठी लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून जनजागृती होणे आवश्यक आहे, असे मत सीटूचे प्रदेशाध्यक्ष डॉ. डी.एल. कराड यांनी बजाजनगर येथे रविवारी व्यक्त केले.
वाळूज महानगर : राज्यातील जनता दुष्काळाने होरपळून निघत आहे, तरीही सरकार लक्ष देत नाही. दुष्काळ निर्मूलनासाठी लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून जनजागृती होणे आवश्यक आहे, असे मत सीटूचे प्रदेशाध्यक्ष डॉ. डी.एल. कराड यांनी बजाजनगर येथे रविवारी व्यक्त केले.
बजाजनगरातील शहीद भगतसिंह शाळेत सीटूतर्फे रविवारी राज्यस्तरीय दुष्काळ निवारण कार्यशाळा घेण्यात आली.
डॉ. कराड म्हणाले की, पाण्याचे योग्य नियोजन, त्यावर उपाययोजना, पाण्याचा पुनर्वापर, शेतकरी व बेरोजगारांच्या हिताच्या सरकारी योजना याविषयी जन संघटनेत जनजागृती होणे काळाची गरज आहे. याविषयी सीटू व समविचारी संघटनेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी गावातील तरुण-तरुणींना सोबत घेऊन यांचा प्रचार, प्रसार करून लोकांमध्ये जनजागृती केली पाहिजे. लोक जागृत झाले तरच दुष्काळ निर्मूलन करता येईल, असे सांगितले.
प्रा. पुरंदरे म्हणाले की, समन्यायी पाणी वाटप होणे गरजेचे आहे. समान पाणीवाटप झाल्यास शेतकऱ्यांचे हित होईल, तर अॅड. भवलकर यांनी पुढारपण गुलामीने ग्रासले असल्यामुळेच मराठवाड्याचे प्रश्न सुटत नाहीत. या विरोधात शेतकरी, मजूर, विद्यार्थी व महिलांनी आवाज उठविणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी कुमार सिराळकर, पंडित वासरे, एम.एच. शेख, अण्णा सावंत, विजय गाभणे आदींनी विचार मांडले. कार्यशाळेला सीटू, किसान सभा, शेतमजूर युनियन, एसएफआय, डीवायएफआय व जनवादी महिला संघटनेच्या अडीचशे ते तीनशे पदाधिकारी-कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी नितीन देशमुख, गौतम शिंदे, शंकर ननुरे, सतीश कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.
विभागीय आयुक्तालयावर मोर्चा
शेतकरी, बेरोजगारी, दुष्काळ, पाणी आदी प्रश्नांवर सरकारविरोधात सीटू, किसान सभा, शेतमजूर युनियन, एसएफआय, डीवायएफआय आदींसह समविचारी संघटनेला सोबत घेऊन १० एप्रिल रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.