सार्वजनिक आरोग्य विभागाने केले औरंगाबादचे 'संभाजीनगर'
By संतोष हिरेमठ | Published: August 6, 2022 09:12 AM2022-08-06T09:12:10+5:302022-08-06T09:13:01+5:30
आता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालात औरंगाबादऐवजी संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे.
संतोष हिरेमठ
औरंगाबाद :औरंगाबादच्या नामांतरावरून राजकीय वाद सुरू आहे. शिंदे - फडणवीस यांच्या नवीन सरकारने औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव नुकताच मंजूर केला आहे. यावरून वाद सुरू असतानाच आता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालात औरंगाबादऐवजी संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे.
औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मंजुरी दिली आहे. मात्र औरंगाबादचे नाव बदलण्यास एमआयएमचा विरोध आहे. या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर गुगल मॅपवर काही दिवसांपूर्वीच औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे दाखविण्यात आले. यालाही विरोध झाला. त्यात नंतर पुन्हा बदल झाला.
राज्याच्या कोरोनाच्या सध्यस्थीतीचा अहवाल सार्वजनिक आरोग्य विभागाने ३ ऑगस्ट रोजी जाहीर केला आहे. हा अहवाल आज समोर आला. या अहवालात औरंगाबादऐवजी संभाजीनगर असा उल्लेख करून रुग्णसंख्येची आणि इतर माहिती नमूद करण्यात आली आहे.