मनोज जरांगे यांची १० ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगरात जाहीर सभा
By बापू सोळुंके | Published: October 6, 2023 01:19 PM2023-10-06T13:19:32+5:302023-10-06T13:19:54+5:30
सभेच्या तयारीसाठी शहरात ठिकठिकाणी कॉर्नर बैठका, पोलिसांकडे परवानगीसाथी अर्ज
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांची जाहीर संवाद सभा मंगळवारी (दि.१०) सायंकाळी ५ वाजता गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित केली आहे. शहरात गुरुवारी विविध ठिकाणी झालेल्या काॅर्नर बैठकांतून या सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी १७ दिवस बेमुदत उपोषण केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी जाऊन ४० दिवसांत हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिल्याने जरांगे यांनी उपोषण स्थगित केले; परंतु अंतरवालीत साखळी उपोषण सुरूच आहे.
मराठा आरक्षण जनजागृती करण्यासाठी चार दिवसांपासून शहरात मराठा समाजाकडून विविध वसाहतींमध्ये कॉर्नर बैठकांचे सत्र सुरू आहे. काल जयभवानीनगर येथे बैठक झाल्यांनतर आज बाळकृष्णनगर, सातारा परिसर, बंबाटनगर येथे बैठका घेण्यात आल्या.
मराठा क्रांती मोर्चाने मागितली सभेला परवानगी
मराठा समाजातील जनतेशी संवाद साधण्यासाठी मनोज जरांगे यांची १० ऑक्टोबर रोजी आयोजित सभेला परवानगी मिळावी, यासाठी मराठा क्रांती मोर्चाने ५ ऑक्टोबर रोजी पोलिस आयुक्तांना अर्ज केला. विजय काकडे, गणेश उगले, जी.के. गाडेकर, अशोक वाघ, गणेश लोखंडे, अवधूत शिंदे आणि श्रीकांत तौर आदींनी हा अर्ज केला आहे.