सार्वजनिक प्रवासी वाहनांना जीपीएस, पॅनिक बटणचे बंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 06:39 PM2018-04-09T18:39:30+5:302018-04-09T18:42:50+5:30
रिक्षा आणि ई-रिक्षा वगळता एक एप्रिलपासून उत्पादित सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना स्थानदर्शक उपकरण (जीपीएस) आपत्कालीन सूचना देणारे बटण (पॅनिक बटण) बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे.
औरंगाबाद : रिक्षा आणि ई-रिक्षा वगळता एक एप्रिलपासून उत्पादित सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना स्थानदर्शक उपकरण (जीपीएस) आपत्कालीन सूचना देणारे बटण (पॅनिक बटण) बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. गेल्या पाच दिवसांपासून ही उपकरणे नसलेल्या वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र देण्यापासून रोखण्यात आले; परंतु केंद्र शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त होईपर्यंत एप्रिलपूर्वी उत्पादित, विक्री आणि नोंदणी झालेल्या वाहनांना सक्ती करण्यात येऊ नये, अशी सूचना गुरुवारी अपर परिवहन आयुक्तांनी केली
अपर परिवहन आयुक्तांनी केलेल्या सुचनेने अनेक वाहनधारकांना तूर्त दिलासा मिळाला आहे. ई-रिक्षा, आॅटो रिक्षा वगळता सर्व प्रकारच्या सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना ‘लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस’ (जीपीएस यंत्रणा) आणि ‘पॅनिक बटण’ बसविणे बंधनकारक करण्यात आले. परिवहन विभागाने त्याबाबतचा आदेश काढला असून, त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. प्रवासी वाहनातून प्रवास करणाऱ्या महिलांना असुरक्षित वाटू लागल्यास किंवा बसमधील सहप्रवासी किंवा गाडीच्या चालकाकडून त्यांच्यासोबत गैरकृत्य केले गेल्यास मदत मागण्यासाठी पॅनिक बटण वापरता येणार आहे.
चालक वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून गाडी भरधाव चालवीत असेल, तर अशा वेळेसदेखील मदतीची मागणी करण्यासाठी याचा उपयोग शक्य आहे. ‘लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस’ (जीपीएस यंत्रणा) आणि ‘पॅनिक बटण’ नसल्याने गेल्या पाच दिवसांपासून आरटीओ कार्यालयाने फिटनेस प्रमाणपत्र देणे थांबविले होते. ही दोन्ही उपकरणे उपलब्ध होत नसल्याची ओरड वाहनधारकांकडून करण्यात आली. अखेर एप्रिल महिन्यापूर्वीच्या वाहनांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला. केंद्र शासनाकडून मार्गदर्शन मिळेपर्यंत त्यांना सक्ती करण्यात येणार नाही; एप्रिलपासून उत्पादित वाहनांना ही उपकरणे असल्याची खात्री करून नोंदणी केली जाणार आहे.