स्कील एज्युकेशनकडे ओढा, दहावीत १०० टक्के घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पॉलिटेक्निकला प्राधान्य
By राम शिनगारे | Published: July 20, 2023 12:26 PM2023-07-20T12:26:37+5:302023-07-20T12:27:11+5:30
९५ टक्के घेतलेले १ हजार विद्यार्थी, तर ९० टक्क्यांच्या ८ हजार विद्यार्थ्यांचा समावेश
छत्रपती संभाजीनगर : झटपट नोकरी देणारा अभ्यासक्रम म्हणून पाॅलिटेक्निकला प्राधान्य देण्यात येते. मात्र, चक्क दहावीच्या परीक्षेत १०० टक्के घेतलेल्या १५ विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी केली. त्याशिवाय ९५ टक्के असणारे १ हजार ४३, ९० टक्के असणाऱ्या ८ हजार ३३३ विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याची माहिती प्राथमिक गुणवत्ता यादीतून समोर आली आहे.
पॉलिटेक्निक अभ्यासक्रम : १ जूनपासून १५ जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी
मराठवाड्यातील शासकीय आणि खासगी पॉलिटेक्निक : एकूण ५८
प्रवेश क्षमता : १५ हजार ६२०
अर्ज प्राप्त : ३१ हजार ९७९
प्रवेशासाठी पात्र : २२ हजार ९९७
गुणवत्ता यादी : दोन दिवसांपूर्वी प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर
अंतिम यादी : २१ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार
पहिल्या फेरीला सुरुवात : २२ जुलैपासून
प्राथमिक गुणवत्ता यादीत किती : १ लाख २४ हजार १८४ विद्यार्थ्यांचा समावेश
मेडिकल, आयआयटीपेक्षा पॉलिटेक्निक बरे
९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणारे विद्यार्थी एमबीबीएस, आयआयटीसारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी ११वी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन नीट, जेईईसारख्या परीक्षांची तयारी करतात. मात्र, गुणवंत विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निकसारख्या अभ्यासक्रमांची निवड केली आहे.
स्कील अभ्यासक्रमांना प्राधान्य
पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांना गुणवंत विद्यार्थ्यांनी प्राधान्य दिले आहे. स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला कौशल्यपूर्ण शिक्षणाची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थी दहावी होताच स्किल प्रदान करणाऱ्या अभ्यासक्रमांना प्राधान्य देत आहेत.
- उमेश नागदेवे, सहसंचालक, तंत्रशिक्षण