साठवणुकीवर निर्बंध आणूनही डाळींचे भाव कडाडलेलेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:03 AM2021-07-12T04:03:27+5:302021-07-12T04:03:27+5:30
प्रशांत तेलवाडकर औरंगाबाद : डाळींचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांचे डोळे पांढरे झाले आहेत. भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने डाळींच्या साठ्यावर ...
प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : डाळींचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांचे डोळे पांढरे झाले आहेत. भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने डाळींच्या साठ्यावर मर्यादा आणली. मात्र, त्याची अपेक्षेप्रमाणे फलश्रुती झालेली नाही. उडीद डाळीचे भाव काही उतरले नाही. अन्य डाळीत किलोमागे २ ते ४ रुपयांचीच घट झाली. साठेबाज अजूनही बाजारात डाळी आणत नसल्याने आणखी किती दिवस ग्राहकांना महाग डाळ खरेदी करावी लागणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
डाळीच्या दराचे नियंत्रण सरकार नव्हे, तर साठेबाजी करणारे मोठे व्यापारी, मल्टिनॅशनल कंपन्या यांच्या हातात गेल्याने ही अवस्था झाल्याचे व्यापारी बोलत आहेत. डाळीच्या दरवाढीमुळे सरकारवर टीका होऊ लागल्याने अखेर ३ जुलै रोजी केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने एक आदेश जारी करून डाळींच्या साठवणुकीवर मर्यादा आणली. यात घाऊक विक्रेत्यांसाठी २०० टन, तर किरकोळ विक्रेत्यांसाठी पाच टन डाळीचा साठा मर्यादा लागू करण्यात आला. ज्यांच्याकडे यापेक्षा अधिक साठा असेल, त्यांनी ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या पोर्टेलवर त्याची घोषणा करायची आहे. मर्यादेपेक्षा अधिकचा साठा ३० दिवसांच्या आत विक्री करावा, असे आदेशात म्हटले आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे डाळीचे भाव कमी होतील, असा दिलासा ग्राहकांना मिळाला होता; पण नागरिकांची निराशा झाली. आठवडाभरात डाळींचे भाव किलोमागे फक्त २ ते ४ रुपये कमी झाले. त्यातही सर्वांत महाग उडीद डाळ १०२ ते १०४ रुपये किलो विकली जात आहे. त्यात मात्र कोणतीच घट झाली नाही. त्यात आता पाऊस गायब झाल्याने मुग, उडीद, तुरीच्या उत्पादनावर याचा परिणाम होईल, यामुळे आणखी भाव घटणार नाही, असे घाऊक व्यापारी सांगत आहेत.
चौकट
डाळींचे भाव
डाळींचे नाव १ जुलै (प्रतिकिलो) १० जुलै
हरभरा डाळ ६८ ते ७० रु. ६६ ते ६८ रु.
तूरडाळ ९६ ते ९८ रु. ९२ ते ९४ रु.
उडीद डाळ १०२ ते १०४ रु. १०२ ते १०४ रु.
मसूर डाळ ८२ ते ८४ रु. ८० ते ८२ रु.
----
चौकट
साठामर्यादा नसताना मूग डाळीच्या किमतीत घसरण
केंद्र सरकारने साठा मर्यादेतून मूग डाळीला वगळले आहे. मात्र, मागील आठवडाभरात हीच डाळ किलोमागे १२ रुपयांपर्यंत खाली उतरली आहे. १०२ ते १०६ रुपये प्रतिकिलो विक्री होणारी मूग डाळ सध्या ९० ते ९४ रुपयास विकली जात आहे.