'पुणे - लातूर - अमरावती' रेल्वे आता पुन्हा धावणार; लातूरकरांसाठी तीन नव्या रेल्वेगाड्या!
By राजकुमार जोंधळे | Published: December 3, 2022 05:08 PM2022-12-03T17:08:18+5:302022-12-03T17:09:15+5:30
१६ डिसेंबरपासून पुणे-लातूर-अमरावती रेल्वेगाडी सुरू करण्यात येणार आहे.
- राजकुमार जोंधळे
लातूर : गत दोन वर्षांपूर्वी बंद केलेली पुणे - लातूर - अमरावती एक्स्प्रेस रेल्वे आता आठवड्यातून दोन वेळा धावणार आहे. विशेष म्हणजे, लातूरकरांच्या सोयीसाठी रेल्वेगाडीचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. लातूर - पुणे इंटरसिटीची मागणी असून, यासाठी खा. सुधाकर शृंगारे यांनी पाठपुरावा केला आहे. आता लवकरच ही रेल्वे सुरू हाेणार आहे. प्रवासी भारमार वाढल्यानंतर आठवड्यात दोन फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य श्यामसुंदर मानधना म्हणाले, १६ डिसेंबरपासून पुणे-लातूर-अमरावती रेल्वेगाडी सुरू करण्यात येणार आहे. काेराेना काळात अनेक रेल्वेगाड्या बंद केल्या हाेत्या. त्यात याही गाडीचा समावेश होता. मात्र, खासदारांच्या प्रयत्नांतून ती पुन्हा सुरू केली जात आहे. आठवड्यात शुक्रवार आणि रविवारी रेल्वे पुणे स्थानकातून लातूर, अमरावतीकडे मार्गस्थ होईल. परतीच्या प्रवासात रविवार आणि मंगळवारी अमरावती येथून लातूर मार्गे पुण्याकडे मार्गस्थ हाेईल.
लातूर स्थानकात पहाटे पाेहोचणार...
पुणे स्थानकावरून ही रेल्वे रात्री १०.५० मिनिटांनी मार्गस्थ हाेणार आहे. लातूर स्थानकावर पहाटे ५.३० मिनिटांनी पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ही रेल्वे अमरावतीवरून रात्री ७.५० वाजता मार्गस्थ हाेणार असून, लातूरला दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३५ वाजता पोहोचेल. तर पुणे शहरात दुपारी ४.२० वाजता पोहोचणार आहे. या रेल्वेगाडीचे पूर्वीचे वेळापत्रक लातूरकरांसाठी गैरसाेयीचे हाेते. मध्यरात्री २.३० वाजता ही रेल्वेगाडी लातूर स्थानकावर येत होती.
पुणे स्थानकातून मार्गस्थ हाेणार...
या गाडीला उरळी कांचन येथे थांबा देण्यात आला आहे. पुणे, कुर्डुवाडी, बार्शी, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी, गंगाखेड, परभणी, पूर्णा, हिंगोली, अकोला, अमरावती असा मार्ग राहणार आहे. गाडीचा क्रमांक ०१४३९ असून, परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१४४० राहणार आहे.
या आठवड्यात तीन नवीन रेल्वे...
सोलापूर - लातूर - तिरुपती, सोलापूर - लातूर - कुर्ला या दोन गाड्या सुरू केल्यानंतर पुणे - लातूर - अमरावती ही रेल्वेगाडी सुरू करण्यासाठी खा. सुधारक श्रृंगारे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. या आठवड्यात तीन नवीन रेल्वेगाड्या लातूर स्थानकातून धावत आहेत.