पुन्हा उसवतेय गणगोत सारं! झाडांवरील घरटे गायब, रेल्वेस्टेशनवरील बगळ्यांना कोण वाचविणार?

By संतोष हिरेमठ | Published: August 6, 2024 06:27 PM2024-08-06T18:27:07+5:302024-08-06T18:28:18+5:30

झाडांवर कुऱ्हाडचे घाव मारण्यापूर्वी घरटे गायब करण्याचा प्रकार, २०१५ मधील पुनरावृत्ती?

Punha Usavateya Gangot Sar! Nests on trees disappear, who will save the herons at the Chhatrapati Sambhajinagar railway station? | पुन्हा उसवतेय गणगोत सारं! झाडांवरील घरटे गायब, रेल्वेस्टेशनवरील बगळ्यांना कोण वाचविणार?

पुन्हा उसवतेय गणगोत सारं! झाडांवरील घरटे गायब, रेल्वेस्टेशनवरील बगळ्यांना कोण वाचविणार?

छत्रपती संभाजीनगर : रेल्वेस्टेशन परिसरातील झाडांवरील बगळ्यांचे गणगोत पुन्हा उसवत असल्याची धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. रेल्वेस्टेशनच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे. बांधकामाच्या जागेतील झाडे तोडण्यासाठी परवानगी आवश्यक आहे आणि ही परवानगी सहजतेने मिळावी, यासाठी झाडांवरील बगळ्यांच्या घरट्यांना गायब करण्याचा प्रकार सुरू आहे. त्यातूनच उडूही न शकणारी बगळ्यांची पिलं जमिनीवर ‘सैरभैर’ अवस्थेत पहायला मिळत आहेत. जणू ‘आम्हाला कोणी वाचविणार का’ अशी सादच ही पिलं घालीत आहेत.

छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनचा ३५९ कोटी रुपयांच्या निधीतून पुनर्विकास करण्यात येत आहे. शहराच्या दळणवळण क्षेत्रासाठी हा मैलाचा दगड ठरणार आहे. मात्र, स्टेशनचा पुनर्विकास करताना झाडांवर कुऱ्हाड पडून शेकडो पक्षी बेघर होत असल्याची स्थिती आहे. काही झाडे अगदी इमारतीला आणि प्लॅटफार्मला लागून आहेत. ही झाडे तोडण्यासाठी त्यावरील घरटी, पक्षी इतरत्र हलविण्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातून काही घरटी, पिलं खाली पडली आहे. ही पिलं रेल्वेस्टेशन परिसरात भयभीत होत फिरत असल्याची स्थिती आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या व्यवस्थापक (डीआरएम) नीती सरकार यांच्याशी वारंवार संपर्क साधला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

काय घडले होते २०१५ मध्ये?
ऑगस्ट २०१५ मध्ये रेल्वेस्टेशनवरील पार्किंगमध्ये वाहनांवर पक्ष्यांची विष्ठा पडत असल्याची काहींनी तक्रार केली होती. त्यावरून पक्ष्यांची घरटी असलेली झाडे तोडण्यात आली. त्यातून झाडांवरील घरटी खाली पडली आणि अनेक बगळ्यांचा जीव गेला.

आम्ही स्थलांतरित करतोय हो?
रेल्वेस्टेशनवरील बगळ्यांची परिस्थिती ‘लोकमत’ प्रतिनिधी, छायाचित्रकार टिपत होते. त्यावरील इमारतीच्या बांधकामावर देखरेख करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘आम्ही बगळ्याची घरटी, पक्षी स्थलांतरित करीत आहोत’, असे सांगितले. मात्र, कुठे स्थलांतरित केले जात आहे, हे सांगितले नाही.

घरटी, बगळे वाचावे
झाडांवर घरटी असेल ते झाड तोडता येत नाही. पक्ष्यांची घरटी इतरत्र स्थलांतर करता येत नाही. घरटी स्थलांतरांचा प्रयत्न कुणी केला तरी पक्ष्यांच्या जीवासाठी ते योग्य होत नाही. सध्या पक्ष्यांचा विणीचा काळ आहे. अशा काळात झाडे तोडता कामा नये. घरटी असेल तर झाडे वाचविलेच पाहिजे. रेल्वेस्टेशनवर २०१५ च्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये.
- किशोर पाठक, मानद वन्य जीव रक्षक

वन विभागाशी संपर्क, ‘एनजीओ’च्या मदतीने स्थलांतर
पार्सल कार्यालयाच्या ठिकाणी दोन झाडांमध्ये एग्रेट पक्षी राहतात. या पक्ष्यांना स्थलांतरित करण्यासाठी आम्ही वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या ‘एनजीओ’ची माहिती प्रदान केली. आम्ही त्या ‘एनजीओ’च्या मदतीने गत आठवड्यात अनेक पक्षी आणि अंडी इतर झाडावर यशस्वीरीत्या स्थलांतरित केली.
- नीती सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम), ‘दमरे’

परवानगी दिलेली नाही
रेल्वेस्टेशनवरील झाडे तोडण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही, असे महापालिकेचे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी सांगितले. पक्ष्यांची घरटी नष्ट केल्यानंतर ही परवानगी मागण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेस्टेशनवरील सूत्रांनी सांगितले.

Web Title: Punha Usavateya Gangot Sar! Nests on trees disappear, who will save the herons at the Chhatrapati Sambhajinagar railway station?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.