५ हजार पलंगांची खरेदी, १५ कोटींची जिल्हा प्रशासनाकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:04 AM2021-03-25T04:04:47+5:302021-03-25T04:04:47+5:30
औरंगाबाद : शहरात कोरोना रुग्णांचा विस्फोट होत आहे. पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी नवीन सेंटर तयार करावी लागत आहेत. ...
औरंगाबाद : शहरात कोरोना रुग्णांचा विस्फोट होत आहे. पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी नवीन सेंटर तयार करावी लागत आहेत. निधीची प्रचंड अडचण असल्याने प्रशासनाला संकटाला तोंड द्यावे लागत आहे. ५ हजार पलंग खरेदी करण्याचा निर्णय घेऊन खरेदीचे आदेश प्रशासकांनी भांडार विभागाला दिले आहेत. कोविड केअर सेंटरमधील सोयीसुविधा व आवश्यक खर्चासाठी पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे १५ कोटींची मागणी केली आहे.
महाविद्यालये, वसतिगृहे, संस्था, मंगल कार्यालये ताब्यात घेऊन त्या ठिकाणी नव्याने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येत आहेत. या कोविड केअर सेंटरमध्ये कोणत्याच सुविधा नाही. रुग्णांसाठी पलंग, गाद्या, उशा, बेडशिट उपलब्ध करून द्यावा लागणार आहेत. त्याशिवाय ज्या खोल्यांमध्ये पंखे नाहीत त्या खोल्यांमध्ये पंखे बसवणे व अन्य सोयी-सुविधा देण्याचे काम पालिकेला करावे लागणार आहे, अशी माहिती शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी दिली.
जिल्हा प्रशासनाकडे १५ कोटी रुपयांचा निधी मागितला आहे. या निधीतून कोविड केअर सेंटर्सच्या इमारतींची देखभाल दुरुस्ती, इमारतींचे भाडे, विजेचे बिल आदी खर्च भागविला जाणार आहे.
एमआयटीने केली चार कोटींची मागणी
एमआयटी कॉलेजच्या बॉईज होस्टलमध्ये पालिकेचे कोविड केअर सेंटर सुरू आहे. कोविड केअर सेंटरसाठी भाड्याने दिलेल्या इमारतीचे सुमारे सव्वा चार कोटी रुपये एमआयटीने मागीतले आहे, तसे पत्र पालिकेला दिले आहे, अशी माहिती सखाराम पानझडे यांनी दिली. अन्यही काही संस्थांनी भाड्याची मागणी केली, पण लेखी पत्र दिलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. विभागीय क्रीडा संकुलात कोविड केअर सेंटर होते. त्याचे विजेचे बिल १२ लाख रुपये आले होते. ते बिल न भरल्यामुळे ‘महावितरण’ने क्रीडा संकुलाचे वीज कनेक्शन तोडले होते,आता ते पुन्हा जोडण्यात आले, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.