घाटीत बालरुग्णांसाठी ७ व्हेंटिलेटरची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:05 AM2021-05-22T04:05:57+5:302021-05-22T04:05:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : घाटी रुग्णालयाने गेल्या तीन आर्थिक वर्षात राज्य योजनेसह जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर ३३ व्हेंटिलेटरच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : घाटी रुग्णालयाने गेल्या तीन आर्थिक वर्षात राज्य योजनेसह जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर ३३ व्हेंटिलेटरच्या खरेदीसाठी ४.६१ कोटी रुपये यापूर्वीच ‘हाफकिन’ला वर्ग केले आहेत. मात्र, अद्याप हे ३३ व्हेंटिलेटर घाटी रुग्णालयाला मिळालेले नाहीत. हाफकिन महामंडळाने ७ बालरुग्णांचे व्हेंटिलेटर पुढील सात दिवसात पुरविण्याचे आदेश ट्रिव्हीट्राॅन हेल्थकेअरला दिले आहेत. मात्र, १४ दिवस उलटूनही अद्याप व्हेंटिलेटरचा पुरवठा झालेला नाही.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालरुग्णांना अधिक धोक्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यादृष्टीने प्रशासनाचेही प्रयत्न सुरु असताना, घाटीने २०१८-१९मध्ये जिल्हा वार्षिक योजना, राज्य योजना, नाॅन प्लान आणि प्लान योजनेतून मागवलेल्या ९पैकी ७ बालरुग्णांसाठी उपयोगात येणाऱ्या व्हेंटिलेटरची खरेदी प्रक्रिया पूर्ण करुन पुढील सात दिवसात पुरवठा करण्याचे आदेश संबंधित कंपनीला दिले आहेत. त्यामुळे बालरुग्णांसाठी महागडे उपचार घाटीत आणखी सुलभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सन २०१८-१९मध्ये ९, २०१९-२०मध्ये २३ तर २०२०-२१मध्ये १ अशा एकूण ३३ व्हेंटिलेटरसाठी मंजूर विविध योजनेतून मिळालेले ४ कोटी ६१ लाख १०० रुपये ‘हाफकिन’ला वर्ग केले आहेत. त्यापैकी ११ लाख ८४ हजार ९६० रुपये प्रति व्हेंटिलेटरप्रमाणे ८२ लाख ९४ हजार ७२० रुपयांची खरेदी प्रक्रिया हाफकिनने ७ मे रोजी पूर्ण केली. पुढील सात दिवसात हे व्हेंटिलेटर घाटीला पुरविण्याचे पुरवठा आदेशात म्हटले आहे. मात्र, १४ दिवस उलटून अद्याप हा पुरवठा झालेला नाही. लवकर हे व्हेंटिलेटर घाटीला मिळावेत, यासाठी घाटी रुग्णालयाकडून पाठपुरावा सुरु आहे.
-----
‘हाफकिन’कडून खरेदीला उशीर
दरवर्षी विविध योजनांतून घाटी, कर्करोग रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला कोट्यवधींची यंत्रसामुग्री मंजूर केली जाते. त्यासाठी मिळालेला निधी तत्काळ ‘हाफकिन’ला वर्ग केला जातो. मात्र, पुढील दोन ते तीन वर्ष ही यंत्रसामुग्री मिळत नसल्याने घाटीत रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. कोरोना काळात तरी या पुरवठ्यासह खरेदी प्रक्रियेला गती देण्याची गरज आहे.