पोलीस प्रशासनाच्या जागेची खरेदी-विक्री

By Admin | Published: August 26, 2015 12:43 AM2015-08-26T00:43:49+5:302015-08-26T00:48:01+5:30

शिराढोण : बनावट कागदपत्राद्वारे पोलीस ठाण्याच्या जागेची भोगवाट्या आधारे ग्रामपंचायत दप्तरी नोंद करण्यात आली़ जमिनीचा खरेदी-विक्री व्यवहार करून बांधकाम

Purchase and sale of police administration | पोलीस प्रशासनाच्या जागेची खरेदी-विक्री

पोलीस प्रशासनाच्या जागेची खरेदी-विक्री

googlenewsNext


शिराढोण : बनावट कागदपत्राद्वारे पोलीस ठाण्याच्या जागेची भोगवाट्या आधारे ग्रामपंचायत दप्तरी नोंद करण्यात आली़ जमिनीचा खरेदी-विक्री व्यवहार करून बांधकाम करीत अतिक्रमण केल्याप्रकरणी माजी पदाधिकारी, अधिकाऱ्यांसह २७ जणाविरुद्ध मंगळवारी शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या कारवाईमुळे शिराढोणसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे़
सपोनि संभाजी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शिराढोण येथील सर्वे नंबर २१४ मधील ग्रामपंचायत मिळकत क्रमांक ७२६ व ७२७ मधील पोलीस वसाहतीच्या समोरील शिराढोण संभाजी चौक ते शिराढोण शिवाजी चौक दरम्यान असणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दक्षीण बाजूस पूर्व-उत्तर कोपऱ्यात असलेली जागा ही ३० जानेवारी २००१ पर्यंत पोलीस विभागाच्या नावे होती़ ही माहिती ग्रामपंचायतीकडून माहितीच्या आधारे मिळविण्यात आली़ माहितीच्या अधिकारात आलेल्या कागदपत्रांची पाहणी केली असता या जागेवर संगणमताने बनावट रेकॉर्ड तयार करून अधिकार नसताना सदर जागा भोगवाट्या आधारे ग्रामपंचायत दप्तरी नोंदीला घेऊन विक्री करता येत नसतानाही ही जागा रजिस्ट्री आधारे विक्री करण्यात आली़ तसेच ३० फेब्रुवारी २००१ ते २५ आॅगस्ट २०१५ या कालावधीत कायदेशीर बाबींचा भंग करून पदाचा दुरूपयोग करीत खोटे बनावट दस्ताऐवज तयार केले़ खोटा पुरावा तयार करून त्याची सार्वजनिक नोंद पुस्तिकेत नोंद करून बनावट दस्ताऐवज खरे म्हणून वापरण्याच्या उद्देशाने सादर करून पोलीस खात्याबरोबरच शासनाचीही फसवणूक केल्याने कायदेशीर कार्यवाही व्हावी, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले़ या फिर्यादीवरून बाळासाहेब माकोडे, तारामती बाळासाहेब यादव, अयूब इसाक कुरेशी, बेबीनंदा प्रभाकर गोरे, बंडू तात्याबा ओव्हाळ, गंगूबाई श्रीरंग माकोडे, चित्रा दिलीपराव कापसे, संजय मनोहर उर्फ बबनराव नान्नजकर उर्फ कासार, अशोक विठ्ठल जाधव, अच्यूत ईश्वर माळी, भैरू केशव माकोडे, श्रीहरी गुलाब माळी, अकबर चाँदखाँ पठाण, बापूराव लक्ष्मण वाघमारे, सज्जाद मंजूरखाँ पठाण, सत्तार इसाक कुरेशी, सुधा जगदिशचंद्र जोशी, शामल बबन सावळकर, मधुकर सदाशिव सहाणे, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी ज्ञानोबा पुदाले, प्रभाकर बोंदर, संतोष बबनराव नान्नजकर, दयानंद महादेव राऊत, व्यंकट विनायक पाडे, अशोक तात्याबा ओव्हाळ, शिवाजी पाटील, अशोक कोंडेकर यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सपोनि संभाजी पवार करीत आहेत. (वार्ताहर)
सदर जागेची भोगवाट्याआधारे ग्रामपंचायत दप्तरी नियमानुसार नोंद करण्यात आली आहे़ संबंधित कुटुंबाने नोंद घेण्यासाठी रितसर विनंती अर्ज सादर करून त्यासंबंधीचे पुरावे सादर केले होते़ त्यानंतर ग्रामपंचायतच्या मासिक बैठकीत चर्चा करून व त्यासंबंधीचा ठराव घेऊन ही नोंद करण्यात आली होती, अशी माहिती येथील माजी सरपंच बाळासाहेब माकोडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़
पोलीस वसाहतीच्या संरक्षक भिंतीला लागून असलेल्या जागेवर पंधरा वर्षांपूर्वी इमारतीचे बांधकाम रितसर परवाना घेऊन सुरू करण्यात आले होते़ तेव्हापासून झोपेत असलेल्या पोलीस प्रशासनाला अचानक जाग आल्याने हा प्रकार समोर आला आहे़ बांधकामादरम्यान पोलीस प्रशासनाने कधीही जागेवर आपला हक्क सांगितल्याचे दिसून येत नाही़ तसेच पोलीस वसाहतीच्या भिंतीचे बांधकाम करतेवेळीही ही जागा वगळूनच बांधकाम पूर्ण करण्यात आले़ त्यावेळीही पोलीस प्रशासनाने कोणतीच भूमिका घेतली नव्हती़ मात्र, अचानकच पोलीस प्रशासनाला जाग आली आहे़ यामागेही गावातील राजकीय हेवेदेवेच असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

Web Title: Purchase and sale of police administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.