अपहरणासाठी बिहारीकडून पिस्तुलाची खरेदी; वाळू माफिया होण्यासाठी गुन्हेगारी विश्वात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 13:01 IST2025-02-07T13:00:08+5:302025-02-07T13:01:13+5:30
वाळू माफिया होण्याच्या स्वप्नातून गुन्हेगारी विश्वात प्रवेश, पोलिसांना चकवा देण्यासाठी खऱ्या बलेनो कारच्याच क्रमांकाचा वापर

अपहरणासाठी बिहारीकडून पिस्तुलाची खरेदी; वाळू माफिया होण्यासाठी गुन्हेगारी विश्वात प्रवेश
छत्रपती संभाजीनगर : एन-४ मधील अपहरणनाट्याचे हर्षल शेवत्रे व शिवराज गायकवाड मुख्य सूत्रधार आहेत. हर्षलचे काही महिने एन-४ मधील एका लहान मुलांच्या शाळेजवळ वास्तव्य होते. त्याच दरम्यान त्यांनी चैतन्य तुपेला हेरले. विशेष म्हणजे, बिहारच्या राजन नामक व्यक्तीकडून त्यांनी उच्च दर्जाच्या पिस्तुलाची ३० हजारांत खरेदी केली होती.
पुण्याला कार्यरत असताना खोलीवरील मित्रांचे उत्पन्न चांगले होते. मात्र, सेंट्रिंगचे काम करूनही हर्षल समाधानी नव्हता. हे पाचही आरोपी जाफ्राबाद तालुक्यातील ब्रह्मपुरी गावातील रहिवासी असून, बालमित्र आहेत. शिक्षणासाठी शहरात असलेल्या प्रणवने एन-४ मध्ये भाडेतत्त्वावर खोली घेतली होती. तेथेच हर्षलचा अनेक दिवस मुक्काम होता. चैतन्य शाळेतून कधी येतो, त्याचे घर कसे आहे, खेळायला बाहेर कधी येतो, कोणासोबत खेळतो, घरात कोण कोण असते, या प्रत्येक बारकाव्याचा त्यांनी तीन महिने अभ्यास केला. त्यानंतर अपहरणाच्या दहा दिवसांपूर्वी टीव्ही सेंटरजवळ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या कृष्णा पठाडेच्या खोलीवर वास्तव्यास असताना अपहरणाच्या कटाला आरोपींनी मूर्त रूप दिले.
आरोपींचा परिचय
- हर्षल पुण्यात सेंट्रिंगचे काम करतो.
- जीवन पुण्यातील काम सोडून नुकताच गावात परतला.
- शिवराज ऊर्फ बंटी जेसीबी चालवितो.
- प्रणव बीसीएसच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी.
- कृष्णा स्पर्धा परीक्षेची तयारी करतो.
तीनदा फसला प्रयत्न, चौथ्यात यशस्वी
२६ जानेवारी रोजी सर्वजण कृष्णाच्या खोलीवर राहण्यास आले. त्यानंतर २७, २८, ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी त्यांची कार हायकोर्ट परिसर ते चैतन्याच्या घरापर्यंत सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तेव्हा त्यांचा अपहरणाचा प्रयत्न अयशस्वी राहिला. दि. ४ फेब्रुवारी रोजी मात्र सोसायटीच्या दुसऱ्या दिशेने नेत कार रस्त्याच्या दिशेने उभी केली, अशाप्रकारे चैतन्यच्या घरासमोरून ते आले. सायकलच्या एक राउंडची मागणी करत एकाने चैतन्यकडून सायकल घेतली. चॉकलेटचे आमिष दाखवत त्याला कारमध्ये बळजबरीने बसविले.
‘राजन’ सहावा आरोपी
पुण्यात कामादरम्यान हर्षलची बिहारच्या राजन नामक व्यक्तीसोबत ओळख झाली होती. त्यानेच पिस्तूल दिल्याचे हर्षलने सांगितले. गुन्हे शाखेचे एक पथक पुण्याला जाऊन आले. मात्र, तो मिळून आला नाही.
बंद सिमकार्ड ‘रिॲक्टिव्ह’ केले
खंडणीच्या मागणीसाठी हर्षलने फेब्रुवारी, २०२३ मध्ये यूपीच्या रुमपार्टनकडून सीम घेतले होते. वर्षभर ते बंद असल्याने हर्षलने २ फेब्रुवारी ‘रिॲक्टिव्ह’ केले. त्यासाठी एक जुना मोबाइल घेतला. त्यावरून फक्त चैतन्याच्या वडिलांना एक कॉल व कंपनीचे सर्व्हिस वेलकमचे ३ मेसेज नोंद आहेत.
वाळू माफिया होण्याचे स्वप्नातून गुन्हेगारी विश्वात प्रवेश
पाचही आरोपी बालमित्र आहेत. सख्खे मामेभाऊ असलेल्या हर्षल व शिवराजची वाळूमाफियांमध्ये उठबैस असायची. त्यामुळे त्यांचेही असंख्य जेसीबी, हायवा घेऊन वाळूमाफिया होण्याचे स्वप्न होते. हातावर वाळू माफियाचा ‘टॅटू’देखील गोंदविला होता. त्यातून त्यांची सातत्याने कमी वेळेत पैसे कमविण्याची इर्षा वाढत गेली. त्यातूनच पुढे पिस्तूल खरेदी करून त्यांनी थेट गुन्हेगारी विश्वात प्रवेश केला.