सहा रुपयांच्या गुणपत्रिकेची खरेदी अडीच रुपयांनी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 11:47 PM2019-04-03T23:47:07+5:302019-04-03T23:51:00+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या खरेदीच्या सुरस कथा चर्चिल्या जात असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गुणपत्रिकेच्या कागद खरेदीच्या निविदा नुकत्याच उघडण्यात आल्या आहेत.
राम शिनगारे
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या खरेदीच्या सुरस कथा चर्चिल्या जात असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गुणपत्रिकेच्या कागद खरेदीच्या निविदा नुकत्याच उघडण्यात आल्या आहेत. या निविदेतील दर आणि यापूर्वी शेषा शाईन कंपनीकडून खरेदी करण्यात आलेल्या दरात ३ रुपये ४५ पैशांचा फरक असल्याचे स्पष्ट झाले.
विद्यापीठातील परीक्षा विभागात गोपनीयतेच्या नावाखाली मनमानी पद्धतीने खरेदी करण्यात येत होती. याविषयी राज्यपालांकडे अनेक तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. यावर माजी कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समितीही नेमण्यात आली होती. या समितीने उच्चशिक्षण विभाग आणि राज्यपाल कार्यालयाकडे अहवाल सादर केल्यानंतरही त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. डॉ. जयश्री सूर्यवंशी प्रभारी परीक्षा संचालक असतानाही त्यांनी अतिरिक्त उत्तरपत्रिका खरेदी करण्याची गरज नसल्याचा अहवाल दिल्यामुळे त्यांच्याकडून पदभार काढण्यात आला होता. याच कालावधीत विद्यापीठाच्या गुणपत्रिकांचा कागद संपला होता. तो खरेदी करण्यासाठी गोपनीयतेच्या नावाखाली मर्जीतील कंपन्यांना आॅर्डर देण्याची तयारी सुरू होती. मात्र, वित्त व लेखाधिकारी डॉ. राजेंद्र मडके यांनी खुल्या निविदांच्या आधारेच खरेदी केली जाईल, असे स्पष्ट केले. यानंतर गुणपत्रिकांचा कागद पुरविण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. यात राज्यातून पाच कंपन्यांनी सहभाग घेतला. मागील वर्षी खरेदी करण्यात आलेल्या शेषा शाईन या कंपनीने निविदा स्पर्धेत सहभाग घेतला नाही. या निविदा नुकत्याच उघडण्यात आल्या आहेत. यात मुंबईतील अटलांटा कंपनीची निविदा सर्वात कमी असल्यामुळे त्यांना गुणपत्रिकेचा कागद पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. या कंपनीचा दर प्रति गुणपत्रिका २ रुपये ५८ पैसे असणार आहे. या दराने तब्बल ७ लाख गुणपत्रिकांचा कागद खरेदी केला जाणार आहे. शेषा शाईन कंपनीने मागील वर्षी गुणपत्रिकेचा कागद पुरविला होता. त्याचा दर हा ६ रुपये ३ पैसे एवढा होता. यावर्षीच्या दरापेक्षा तब्बल ३ रुपये ४५ पैसे एवढा अधिकचा दर विद्यापीठ प्रशासनाने शेषा शाईन कंपनीला मंजूर केला आहे. या दरावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे.
(चौकट)
२५ लाख रुपयांपेक्षा अधिकचा फरक
विद्यापीठाच्या गुणपत्रिकांच्या मागील वर्षी आणि यावर्षीच्या कागद खरेदीमध्ये तब्बल २५ लाख रुपयांचा फरक असल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यापीठातील विभाग आणि संलग्न महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना वर्षभरात दोन्ही सत्रांसाठी ७ लाख गुणपत्रिका वितरित होतात. मागील वर्षीचा दर ६ रुपये ३ पैसे होता. यावर्षीचा हाच दर २ रुपये ५८ पैशांवर आला आहे. यात विद्यापीठाचे २५ लाखांपेक्षा अधिकचे नुकसान झाल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.
परीक्षेची कंत्राटे दोन-तीन कंपन्यांनाच
विद्यापीठातील परीक्षा विभागाची विविध कंत्राटे वुई शाईन, शेषा शाईन या कंपन्यांनाच वारंवार देण्यात येत आहेत. विद्यापीठातर्फे घेण्यात आलेली सीईटी, पेट परीक्षा, महाविद्यालयांना प्रश्नपत्रिका पाठविणे, उत्तरपत्रिकांची छपाई, पदव्यांची छपाई, गुणपत्रिकांचा कागद आदींची कोट्यवधी रुपयांची कंत्राटे या दोन कंपन्यांनाच देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.