भाविकांना पिण्यासाठी मिळणार शुध्द पाणी

By Admin | Published: May 30, 2017 12:26 AM2017-05-30T00:26:41+5:302017-05-30T00:27:51+5:30

तुळजापूर :भाविकांना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या अनुषंगाने तुळजाभवानी मंदिरासमोर मिनिरल वॉटर सेंटर उभारण्याचा ठराव पालिकेच्या सभेत घेण्यात आला.

Pure water for the devotees to drink | भाविकांना पिण्यासाठी मिळणार शुध्द पाणी

भाविकांना पिण्यासाठी मिळणार शुध्द पाणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक तुळजापुरात येतात. या भाविकांना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या अनुषंगाने तुळजाभवानी मंदिरासमोर मिनिरल वॉटर सेंटर उभारण्याचा महत्त्वपूर्ण ठराव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
तुळजापूर नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी प्रभारी नगराध्यक्ष पंडीतराव जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद सभागृहात संपन्न झाली. या सभेस अध्यक्षांसह १५ नगरसेवक उपस्थित होते. तर सात नगरसेवकांची अनुउपस्थिती होती. सुमारे दीड तास चाललेल्या या सभेत प्रारंभी मागील १० मार्च रोजीच्या बैठकीतील वृत्तांत वाचून कायम करण्यासाठी मतदान घेण्यात आले. १२ विरुध्द ३ मतांनी हा विषय पारित झाल्यानंतर २० एप्रील नगरविकास दिन म्हणून साजरा करण्यास व राज्यसरकारने नगरपरिषदांना प्रोत्साहन लागू केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.
तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेचे वास्तव्य असल्याने लाखोंच्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात. परंतु, अनेक वेळा पिण्याच्या पाण्यासाठी भाविकांना हॉटेल्सचा किंवा विकतच्या पाण्याचा आधार घ्यावा लागतो. ही अडचण लक्षात घेऊन भाविकांसाठी पिण्याचे शुध्द उपलब्ध करून देण्याबाबत सभेत चर्चा करण्यात आली. चर्चेअंती तुळजाभवानी मंदीरासमोरील जागेत ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर मिनिरल वॉटर सेंटर उभारण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. यामुळे भाविकांची पाण्यासाठी होणारी गैरसोय आता दूर होणार आहे.
वार्ड निहाय स्वच्छता कामाच्या ठेक्यास मुदतवाढ देण्याबाबतही या सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. शहरातील प्राचिन मंकावती कुंडातील गाळ काढणे, महिलांकरिता चेंजिंग रूमची सुविधा व्हावी या उद्देशाने खोलीचे बांधकाम करणे, हे विषय तुळजापूर शहर विकास प्राधिकरणात प्रस्तावित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच चालू आर्थिक वर्षात २०१७-०१८ चा फुटपाथ कर रद्द करण्याचा ठरावही सर्वानुमते पारित झाला. आॅनलाइन बांधकाम परवान्यासाठी अद्ययावत संगणक खरेदी करणे, १० मार्च १९९३ नंतरचे रोजंदारी व एकत्रित मानधनावरील कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करणे, सन २०१७-१८ चे तुरटी, ब्लिचिंग खरेदी करण्यास कार्योत्तर मान्यता, आदी तेरा ठराव यावेळी घेण्यात आले. या सभेस संतोष परमेश्वर (कदम), वैशाली कदम, रेश्मा कदम, अश्विनी रोचकरी, शारदा भोसले, सचिन पाटील, आरती इंगळे हे नगरसेवक गैरहजर होते.

Web Title: Pure water for the devotees to drink

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.