जिल्ह्यात १ एप्रिलपासून मतदार याद्यांची शुद्धीकरण मोहीम
By Admin | Published: March 29, 2016 11:50 PM2016-03-29T23:50:49+5:302016-03-30T00:09:46+5:30
नांदेड : मतदार यादीतील सर्व प्रकारच्या चुका दुरूस्त करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्या शुद्धीकरणाचा कार्यक्रम (एनइआरपी २०१६) जाहीर केलेला आहे़
नांदेड : मतदार यादीतील सर्व प्रकारच्या चुका दुरूस्त करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्या शुद्धीकरणाचा कार्यक्रम (एनइआरपी २०१६) जाहीर केलेला आहे़ या मोहिमेस १ एप्रिलपासून सुरूवात होत असून जिल्ह्यातील मतदार याद्यांचे शुद्धीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिली आहे़
सदरील मोहिमेदरम्यान नवीन मतदारांची नोंदणी, मतदारांच्या नावातील चुका दुरूस्त करणे, दुबार मतदारांची नावे वगळणे, ज्या मतदारांची फोटो नाही त्यांचे फोटो जमा करणे व त्यांना ओळखपत्र देणे इत्यादी बाबी हाती घेण्यात येणार आहेत़ याशिवाय १ जानेवारी २०१६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या नवीन मतदारांची नोंदणी व महिलांच्या नोंदणीची मोेहीम हाती घेण्यात येणार आहे़
या मोहिमेच्या कालावधीत बीएलओ हे त्यांच्या मतदान केंद्राच्या हद्दीतील सर्व घरांना भेट देवून मतदारांची माहिती घेणार आहेत़ मतदार हे त्या भागाचे रहिवासी असल्याची खात्री बीएलओ मार्फत करण्यात येणार आहे़ आणि बीएलओ हे मतदारांचे मोबाईल क्रमांक आणि ई-मेलची माहिती घेतील़
त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राची या मोहिमेत तपासणी करण्यात येणार असूून केंद्रावर असलेल्या सोयी-सुविधांची तपासणी करण्यात येणार आहे़ यानंतर गरजेनूसार मतदार केंद्राची इमारत बदल आणि नवीन मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात येणार आहेत़
(प्रतिनिधी)