केळी, कमळाची मुळं, बुंध्यांपासून पाण्याचे शुद्धीकरण; अल्प किमतीत तयार होणार यंत्र

By राम शिनगारे | Published: December 14, 2023 07:20 PM2023-12-14T19:20:22+5:302023-12-14T19:21:02+5:30

तिन्ही प्राध्यापकांनी एकत्र येत केळी, कमळ आणि भाताच्या तनिसावर प्रक्रिया केली. त्यासाठी जलशुद्धीकरण करणाऱ्या स्वस्तातील यंत्राचे डिझाइन तयार केले.

Purification of water from bananas, lotus roots, bundles; The device will be manufactured at a low cost | केळी, कमळाची मुळं, बुंध्यांपासून पाण्याचे शुद्धीकरण; अल्प किमतीत तयार होणार यंत्र

केळी, कमळाची मुळं, बुंध्यांपासून पाण्याचे शुद्धीकरण; अल्प किमतीत तयार होणार यंत्र

छत्रपती संभाजीनगर : केळी, कमळाची मुळं, बुंध्यांसह भाताच्या तनिस (काड्या) या टाकाऊ पदार्थांपासून पाण्याचे शुद्धीकरण करता येते. त्यासाठी अतिशय स्वस्तातील जलशुद्धीकरण यंत्र बनविण्याची किमया तीन संशोधक प्राध्यापकांनी साधली आहे. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. मदनलाल सूर्यवंशी आणि सोलापुरातील प्रा. सिद्रामाप्पा धरणे, प्रा. सिद्धराज कुंभार यांचा समावेश आहे.

यंत्र कसे व त्याचे कार्य कसे चालते?
मद्रास आयआयटीमध्ये तिन्ही संशोधक प्राध्यापकांनी २०१९ साली पाण्याची क्षारता व तापमान तपासण्याविषयी ४० दिवसांचे प्रशिक्षण घेतले होते. या प्रशिक्षणानंतर तिन्ही प्राध्यापकांनी एकत्र येत केळी, कमळ आणि भाताच्या तनिसावर प्रक्रिया केली. त्यासाठी जलशुद्धीकरण करणाऱ्या स्वस्तातील यंत्राचे डिझाइन तयार केले. या डिझाइनच्या उपकरणाचे चार भाग केले. त्यातील पहिल्या भागामध्ये वरती तरंगणाऱ्या कमळाच्या मुळांचा आणि बुडाचे पावडर करून तरंगत्या स्वरूपात ठेवले. त्यानंतर दुसऱ्या थरात केळीच्या बुंध्यांचे फायबर व केळीच्या मुळापासून मिळालेले शुद्धीकरणाचे गुणधर्म ठेवण्यात आले. त्यात पुन्हा केळी व कमळाचे पावडर मिसळले. त्याचबरोबर तुरटीचा सर्वांत शेवटी वापर करून जल शुद्ध करण्यात आले. त्यानंतर पाण्यातील टीडीएस (क्षारतेचे प्रमाण) तपासले. तेव्हा जलशुद्धीकरणाच्या इतर उपलब्ध यंत्रांपेक्षा अतिशय किफायतशीर रिझल्ट प्राध्यापकांच्या संशोधनाला मिळाला आहे.

उपयोग काय होणार?
केंद्र व राज्य शासन जनतेला शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. या शोधामुळे स्वस्तात जलशुद्धीकरण यंत्र उपलब्ध होणर आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांना केळी, कमळाचा बुंधा, भाताचे तनिस या टाकाऊ पदार्थांपासून उत्पन्न मिळू शकणार आहे. हे जलशुद्धीकरण पूर्णत: नैसर्गिक घटकावर अवलंबून असल्यामुळे सेंद्रिय जलशुद्धीकरण करता येणार आहे.

संशोधनाला केंद्र शासनाचे पेटंट
प्राध्यापकांनी तयार केलेल्या यंत्रासह जलशुद्धीकरणाच्या प्रक्रियेचा शोधप्रबंध प्रकाशित झाल्यानंतर त्याविषयीच्या पेटंटसाठी केंद्र शासनाच्या पेटंट कार्यालयाकडे १५ मार्च २०२२ रोजी नोंदणी केली. त्यानुसार पेटंट कार्यालयाने ८ डिसेंबर २०२३ रोजी तिन्ही प्राध्यापकांच्या संशोधनाला पेटंट जाहीर केले आहे.

मदनलाल सूर्यवंशींचे दोन प्रकल्प पूर्ण
विद्यापीठातील भूगोलचे विभागप्रमुख डॉ. मदनलाल सूर्यवंशी यांच्या संशोधनाला एक पेटंट जाहीर झाले आहे. तर, दुसरे एक पेटंट प्रकाशित झाले असून, त्यांनी दोन संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. आतापर्यंत ५० पेक्षा अधिक शोधनिबंधही त्यांनी प्रकाशित केले आहेत.

Web Title: Purification of water from bananas, lotus roots, bundles; The device will be manufactured at a low cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.