पूर्णा नदी उकरण्याचा गोरखधंदा पंधरा वर्षांपासून सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:05 AM2021-03-04T04:05:21+5:302021-03-04T04:05:21+5:30

प्रशांत सोळुंके चिंचोली लिंबाजी : परिसरातून गेलेल्या पूर्णा नदीपात्रातून गेल्या पंधरा वर्षांपासून अवैध मार्गाने वाळू उपसा सुरू आहे. बेसुमार ...

Purna river digging has been going on for fifteen years | पूर्णा नदी उकरण्याचा गोरखधंदा पंधरा वर्षांपासून सुरू

पूर्णा नदी उकरण्याचा गोरखधंदा पंधरा वर्षांपासून सुरू

googlenewsNext

प्रशांत सोळुंके

चिंचोली लिंबाजी : परिसरातून गेलेल्या पूर्णा नदीपात्रातून गेल्या पंधरा वर्षांपासून अवैध मार्गाने वाळू उपसा सुरू आहे. बेसुमार वाळू उपसल्यामुळे नदीची अवस्था बकाल झाली असून, यामुळे अनेक ठिकाणी नदीचा प्रवाह बदलला आहे. याकडे महसूल तसेच पिशोर पोलीस सोयीस्कर डोळेझाक करीत असल्याने वाळू माफियांचे चांगलेच फावत आहे.

वाळूला सोन्याचा भाव आल्याने अनेक जण या व्यवसायात उतरले आहेत. वाळू पट्ट्यांचा लिलाव झालेला नसताना अवैध मार्गाने हे वाळू माफिया वाळूवर डल्ला मारून गब्बर होत आहे. ग्रामीण भागातही कर्ज काढून ट्रॅक्टर घ्यायचे आणि प्रशासनाला हप्त्यांच्या रूपाने मॅनेज करून बिनधास्तपणे दिवस-रात्र नदीपात्रातून वाळू उपसा करायचा व शहरासह इतर भागांत नेऊन विक्री करायचा असे व्यवसाय सध्या भरभराटीला आले आहेत. सात वर्षांपासून नदीपात्रात मुबलक वाळू उपलब्ध असतानाही शासकीय लिलाव का होत नाहीत. नेमके घोडे अडले तरी कुठे, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे. पावसाळा संपताच गेल्या पाच महिन्यांपासून आठही वाळू पट्ट्यांतून अवैध मार्गाने हजारो ब्रास वाळूची चोरी करण्यात आली आहे. बहुधा रात्रीतून चालणाऱ्या चोरट्या वाळू वाहतुकीवर पोलीस व महसूल प्रशासन वरवरच्या कारवाया करून डोळेझाक करीत आहे. प्रशासनाच्या वाळू माफियांशी असलेल्या या ‘गुलाबी’ संबंधांमुळे अनेक गावांची जीवनदायी असलेली पूर्णा नदी उद्ध्वस्त होत आहे.

चौकट

लाखो रुपयांचा महसूल पाण्यात

यावर्षी परिसरात अतिवृष्टी झाल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू जमा झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून वाळू पट्ट्यांची पाहणी करून या वाळू पट्ट्यांचा शासकीय लिलाव करणे अपेक्षित होते. मात्र, याकडे साफ दुर्लक्ष करून डोळेझाक करण्यात आल्याचे दिसून येत आहे. चिंचोली लिंबाजी, वाकी, नेवपूर, बरकतपूर रायगाव, वाकद, शेलगाव, दिगाव, खेडी या आठही वाळू घाटांत हजारो ब्रास वाळू उपलब्ध असतानाही याकडे का दुर्लक्ष करण्यात आले असावे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.

-परिसरातील रस्त्यांची चाळणी

चिंचोली लिंबाजी परिसरातील आठही वाळू पट्ट्यांतून वाळू चोरून नेणारे ट्रॅक्टर रस्त्यावरून बेफाम धावतात. यामुळे बोरगाव-नागापूर, चिंचोली लिंबाजी-घाटनांद्रा, करंजखेड-घाटशेंद्रा, या मुख्य रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

फोटो : चिंचोली लिंबाजी परिसरात बेसुमार वाळू उपशामुळे पूर्णा नदीपात्राची झालेली बकाल अवस्था.

020321\20210123_120757_1.jpg

चिंचोली लिंबाजी पुर्णा नदीतून झालेला बेसुमार वाळुउपसा.

Web Title: Purna river digging has been going on for fifteen years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.