खंडपीठ स्थापनेचा उद्देश सफल झालाय; आता न्याय मिळवून देण्याची जबाबदारी तरुण वकिलांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 03:08 PM2020-08-28T15:08:27+5:302020-08-28T15:13:31+5:30
औरंगाबाद खंडपीठाचा ३९ व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम ऑनलाईन साजरा करण्यात आला
औरंगाबाद : दाखल आणि निकाली प्रकरणांची संख्या पाहता मराठवाड्यातील पक्षकारांना त्यांच्या दारात न्याय मिळत असल्याचे सिद्ध होते. परिणामी, मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठाच्या स्थापनेचा उद्देश सफल झाला असला तरी न्यायापासून वंचित असलेल्या पक्षकारांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी तरुण वकिलांवर आहे, अशी भावना खंडपीठातील ज्येष्ठ न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी व्यक्त केली. खंडपीठाच्या ३९ व्या वर्धापन दिनाच्या ऑनलाईन कार्यक्रमात ते मार्गदर्शन करीत होते.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाच्या वर्धापन दिनानिमित्तच्या शुभेच्छा त्यांनी वाचून दाखविल्या. मुख्य न्यायमूर्ती सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात खंडपीठाला भेट देतील, असे त्यांनी सांगितले.
खंडपीठ वकील संघाच्या सदस्यांमधून न्यायमूर्ती नरेश पाटील हे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदावर विराजमान झाले होते. त्याचप्रमाणे वकिलांमधून अनेकांची न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली तर अनेकांना ज्येष्ठ न्यायमूर्ती म्हणून खंडपीठाने नियुक्त केले. ज्युनिअर वकील ही परंपरा चालू ठेवतील, अशी आशा न्या. गंगापूरवाला यांनी व्यक्त केली.
खंडपीठ वकील संघाचे सचिव अॅड. शहाजी घाटोळ पाटील यांनी खंडपीठाच्या स्थापनेचा इतिहास सांगत वकिलांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधले. लॉकडाऊन काळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंंगद्वारे सुनावणी होत असल्यामुळे वकिलांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यासंदर्भात तसेच प्रत्यक्ष सुनावणी सुरू करण्याची विनंती त्यांनी केली. अॅड. अनघा पेडगावकर यांनी सूत्रसंचालन केले, तर वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड. अश्फाक पटेल यांनी आभार मानले.
खंडपीठात प्रलंबित प्रकरणे :
- मूळ दिवाणी प्रकरणे ८३४०२
किरकोळ दिवाणी प्रकरणे ५६८७३ अशी
एकूण दिवाणी प्रकरणे १४०२७५
- मूळ फौजदारी प्रकरणे १७२४३
किरकोळ फौजदारी प्रकरणे २९९८
एकूण फौजदारी प्रकरणे २०२४१
- खंडपीठासाठी न्यायमूर्तींची मंजूर पदे २२
सध्या कार्यरत न्यायमूर्ती १२