पुरुषोत्तम अग्रवाल यांना जीवनगौरव पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 12:09 AM2018-01-08T00:09:30+5:302018-01-08T00:10:04+5:30

महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलनाच्या २३ व्या अधिवेशनात अजंता फार्मा लि.चे. प्रेरक आणि संस्थापक पुरुषोत्तम अग्रवाल यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

Purshottam Agarwal gets lifetime achievement award | पुरुषोत्तम अग्रवाल यांना जीवनगौरव पुरस्कार

पुरुषोत्तम अग्रवाल यांना जीवनगौरव पुरस्कार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलनाच्या २३ व्या अधिवेशनात अजंता फार्मा लि.चे. प्रेरक आणि संस्थापक पुरुषोत्तम अग्रवाल यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी उद्योग व मानव कल्याणासाठी केलेल्या अतुलनीय कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.
सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात आयोजित अधिवेशनात राष्ट्रसंत आचार्य विजय कौशलजी महाराज, भागवत भास्कर डॉ. संजय कृष्ण सलीलजी महाराज, महामंडलेश्वर जगद्गुरूइंद्रदेवश्वरानंद सरस्वती यांच्या हस्ते जीवनगौरव, अग्रभूषण व अग्रश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. अधिवेशनाचे उद्घाटन खा. डॉ. सुभाषचंद्र गोयल, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते झाले. यावेळी अग्रवाल संमेलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोपालशरण गर्ग, प्रांतीय अध्यक्ष विजयकुमार चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. पुरुषोत्तम अग्रवाल यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळेस नाट्यगृहात उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांच्या कार्याला सलाम केला. यावेळी मुंबई येथील डालचंद गुप्ता यांना अग्रभूषण तर विनोद अग्रवाल, सत्यनारायण अग्रवाल, प्रकाश मेहाडिया, सुरेश अग्रवाल, मधुसूदन गाडोदिया, वेदप्रकाश गुप्ता, राजेश अग्रवाल, पन्नालाल अग्रवाल यांना अग्रश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी ‘छत्रपती महाराजा अग्रसेन की जय’ असा जयघोष केला. डॉ. संजय कृष्ण सलीलजी महाराज म्हणाले की, तुमचा किती मोठा परिवार आहे हे महत्त्वाचे नाही, तर तुम्ही सर्व एकत्र बसून जेवतात का, हे महत्त्वाचे आहे. आपल्या मुलांना उत्तम संस्कार द्या, तेच मूल समाजाचे व देशाचे नाव उंच करील. जगद्गुरूइंद्रदेवश्वरानंद सरस्वती यांनी सांगितले की, पुरस्कार सहज मिळत नाही. तो पुरस्कार मिळविण्यासाठी तेवढी पात्रता तयार करावी लागते. तेव्हा समाज स्वत: तुम्हाला पुरस्कार देईल. नेहमी म्हटले जाते जमाना बदल गया पण ते सत्य नाही, सूर्य, चंद्र, पृथ्वी बदलले नाही. मात्र, आपल्यातील संस्काराची वृद्धी झाली नाही म्हणून आपणास जमाना, समाज बदलल्यासारखे वाटते हे सत्य असल्याचे त्यांनी नमूद केले. देशात व्यापारी कल्याण आयोग तर राज्यात व्यापारी कल्याण बोर्ड स्थापन करावा, अशी मागणी राष्ट्रीय अध्यक्ष गोपालशरण गर्ग यांनी केली. अग्रवाल समाज उद्योग,व्यवसायात पुढे आहे; पण ‘राजकारणा’ चा टक्का कमी असल्याचे मत स्वागताध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल यांनी मांडले.
राज्याध्यक्ष विजयकुमार चौधरी यांनी सर्व मान्यवरांच्या कार्याचा गौरव केला. सोहळा यशस्वीतेसाठी सहकार्य केले त्यांचे आभार अग्रवाल सभेचे अध्यक्ष डॉ. सुशील भारुका यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. समितीचे महामंत्री विशाल लदनिया, वरिष्ठ उपाध्यक्ष केशव लीला, ऋषी बागला, रतनलाल अग्रवाल, सीताराम अग्रवाल, निर्मला अग्रवाल, नवनीत भारतिया, रजनी बगडिया यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या अधिवेशनाचे नियोजन उत्तम प्रकारे करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून अग्रवाल समाजबांधव आले होते.
अग्रसेन महाराजांनी
समाजवादाचा पाया रचला
लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी सांगितले की, ५ हजार वर्षांपूर्वी अग्रसेन महाराजांनी समाजवादाचा पाया रचला होता. अग्रोहा धाम येथून निघालेल्या अग्रवाल समाजबांधवांनी देशातच नव्हे, तर जगात आपल्या कार्याने, कर्तृत्वाने वेगळे स्थान निर्माण केले आहे. शांती, संस्कृती टिकवून ठेवण्यात तसेच समाजसेवा, योगदानात अग्रवाल समाज नेहमी अग्रेसर राहतो. औरंगाबादेत दरवर्षी सर्व समाजबांधव एकत्र येऊन अग्रसेन महाराजांची जयंती जल्लोषात साजरी करतात, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

 

Web Title: Purshottam Agarwal gets lifetime achievement award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.