कार्यकर्त्यांचा आधार होत्या पुष्पाताई....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 12:51 PM2020-10-04T12:51:58+5:302020-10-04T12:54:32+5:30
प्रसिद्ध विचारवंत, परखड समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांचे आणि औरंगाबदचे ऋणानुबंध होते. त्यांचे जाणे म्हणजे साहित्य, समाजकार्य या क्षेत्रात पोकळी निर्माण करणारे आहे. एक प्रेमळ, मृदू; परंतु वेळप्रसंगी तेवढेच कणखर आणि करारी व्यक्तिमत्त्व असलेल्या पुष्पाताई म्हणजे कार्यकर्त्यांचा आधार होत्या, अशा भावना विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केल्या.
औरंगाबाद : प्रसिद्ध विचारवंत, परखड समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांचे आणि औरंगाबदचे ऋणानुबंध होते. त्यांचे जाणे म्हणजे साहित्य, समाजकार्य या क्षेत्रात पोकळी निर्माण करणारे आहे. एक प्रेमळ, मृदू; परंतु वेळप्रसंगी तेवढेच कणखर आणि करारी व्यक्तिमत्त्व असलेल्या पुष्पाताई म्हणजे कार्यकर्त्यांचा आधार होत्या, अशा भावना विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केल्या.
१. कार्यकर्त्यांसाठी सदैव तत्पर
२००५ साली माझ्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला पुष्पाताई प्रमुख भाष्यकार म्हणून उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी केलेल्या भाषणातून त्यांची दिसून आलेली दूरदृष्टी अफलातून होती. भाषेवरचे प्रभुत्व थक्क करणारे होते. संयुक्त महाराष्ट्राचा लढा, गोवामुक्ती, नामांतराचा लढा यासोबतच ७० च्या दशकातील सर्व लढ्यांच्या त्या साक्षीदार होत्या. मी तेव्हा वय आणि अनुभवाने लहान होते आणि त्या प्रत्येक बाबतीतच ज्येष्ठ होत्या; पण तरीही लहानांना समजून घेणे, मार्गदर्शन करणे या गोष्टी पुष्पाताईंनी नेहमीच केल्या. कार्यकर्त्यांसाठी त्या सदैव तयार असायच्या. सगळ्यांचे फोन उचलायचे आणि सगळ्यांशी बोलायचे, हा त्यांचा स्वभाव होता. आमच्या सगळ्यांसाठीच त्या आदर्श होत्या.- मंगल खिंवसरा
२. ... आणि मला पुन्हा परीक्षा देता आली
महाविद्यालयात असताना पुष्पाताई मला मराठी शिकवायच्या. शिक्षणाव्यतिरिक्त इतर सामाजिक कार्यातही त्या आम्हा विद्यार्थ्यांना कायम प्रोत्साहन द्यायच्या. इंदिरा गांधींच्या आणीबाणीविरुद्ध १९७५ साली आम्ही विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन केले होते. त्यासाठी त्यांचे खूप सहकार्य लाभले. एका बाजूला अभ्यास आणि दुसऱ्या बाजूला या सगळ्या गोष्टी यांचा समताेल सांभाळायलाही त्यांनीच शिकविले. चिडणे त्यांना कधी माहितीच नव्हते. एकदा महाविद्यालयाची परीक्षा चालू असताना मी माझा आसन क्रमांक विसरलो आणि चुकीच्या आसन क्रमांकावर जाऊन पोहाेचलो. त्या धांदलीत माझा पेपर बुडाला; पण बाईंनी तेव्हा मध्यस्ती केली. विद्यापीठातून परवानगी काढली आणि मला पुन्हा परीक्षा देता आली.
- शांताराम पंदेरे
३. त्यांच्या मार्गदर्शनाची संधी हुकली
एमए होण्याच्या आधी मला संशोधन शिष्यवृत्ती मिळाली होती. मला नाटकात पीएच.डी. करायची होती. त्यामुळे मुंबईला जा आणि पुष्पाताईंकडे कर, असा सल्ला मला अनेकांनी दिला. त्यानुसार मी पुष्पाताईंकडे गेलो. त्यांनीही तात्काळ होकार दिला; पण मला मुंबई न आवडल्याने मी १०-१५ दिवसांतच परत आलो. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी हुकली. मात्र, यानिमित्ताने आमचा चांगला कौटुंबिक स्नेह जुळला. औरंगाबादला येताना हमखास त्या मला निरोप करायच्या आणि मग आम्ही बसैयेकडचे त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना आवर्जून आणून द्यायचो. बलदंड राज्यसत्तेच्या विरोधात उभे राहिलेले ते एक कणखर व्यक्तिमत्त्व होते. त्या बोलत्या आणि कर्त्या सुधारक होत्या.
- डॉ. दासू वैद्य
४. तर्कशुद्ध मांडणी हे त्यांचे वैशिष्ट्य
पुष्पा भावे या अतिशय स्पष्ट वक्त्या होत्या. तेवढीच स्पष्ट त्यांची समीक्षाही होती. कोणत्याही गोष्टीचे अतिशय स्पष्ट मूल्यमापन करणे, त्यांना अगदी चपखल जमत होते. सामाजिक बांधिलकीची जाणीव त्यांना नेहमीच होती. साहित्य क्षेत्रात त्यांचा दबदबा होता. रंगभूमीचा त्यांचा अभ्यास अतिशय सखोल होता. मराठी रंगभूमीविषयी त्यांनी जे लिहिले आहे, ते एक मूलभूत स्वरूपाचे लेखन आहे. अनंत भालेराव पुरस्कार प्रदान झाला तेव्हा त्यांची आणि माझी शेवटची भेट झाली होती. अतिशय तर्कशुद्ध मांडणी असायची आणि त्यामुळे त्यांची मते नाकारणे किंवा खोडून काढणे जवळपास अशक्य असायचे. त्यांनी फार लिखाण केले नाही; पण जे लिहिले ते अतिशय मौल्यवान आहे.
- डॉ. सुधीर रसाळ
५. भूमिका घेणाऱ्या व्यक्ती
पुष्पा भावे यांची आणि माझी प्रत्यक्ष कधीही भेट झाली नाही; परंतु एक व्यक्ती म्हणून मला त्यांच्याबद्दल फार आदर होता, कारण त्या एक भूमिका घेणाऱ्या व्यक्ती होत्या. चांगल्या समीक्षक आणि चांगल्या अभ्यासू होत्या. त्यांनी व्यवस्थेच्या, सरकारच्या विरोधात नेहमी भूमिका घेतली आणि कायम आवाज उठवला.
-अनुराधा पाटील