बालम टाकलीतील तरुण, वृद्धावर काळाचा घाला; मुली, बहिणींसाठी भाऊबीज कायमची दुरावली

By सुमित डोळे | Published: November 18, 2023 01:35 PM2023-11-18T13:35:30+5:302023-11-18T13:35:53+5:30

दुचाकीने शहराकडे निघालेले वृद्ध, तरुण टँकरचालकाने ओव्हरटेक केल्याने थेट चाकाखाली चिरडले गेले.

Put black on the young, old in Balam Takali; Brothers and sisters are forever separated for daughters and sisters | बालम टाकलीतील तरुण, वृद्धावर काळाचा घाला; मुली, बहिणींसाठी भाऊबीज कायमची दुरावली

बालम टाकलीतील तरुण, वृद्धावर काळाचा घाला; मुली, बहिणींसाठी भाऊबीज कायमची दुरावली

छत्रपती संभाजीनगर : वेगवेगळ्या गावांत राहणाऱ्या सहा बहिणींनी भाऊबीजेनिमित्त शहरातील बहिणीकडे एकत्र येण्याचे ठरवले. शुक्रवारी कार्यक्रमाचे नियोजनही केले. शेवगाव तालुक्यात राहणारे वडील सुरेश परदेशी (७६) यांना आदल्या दिवशीच बोलावून घेतले. तर त्याच गावातील केशव विठ्ठल भिसे (२५) हाही शहरात राहणाऱ्या बहिणीला भेटण्यासाठी निघाला होता. बस न भेटल्याने परदेशी, केशव एकाच दुचाकीवर निघाले. काळाने मात्र कुटुंबाच्या भेटीआधीच त्यांच्यावर घाला घातला. गुरुवारी रात्री ८ वाजता कांचनवाडी येथे टँकरखाली येऊन या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

निवृत्त शिक्षक परदेशी व केशव बालम टाकळी गावात राहत. परदेशी हे गुरुवारी सायंकाळी बीड बायपासला राहणाऱ्या मुलीकडे येण्यासाठी निघाले होते. केशव देखील नक्षत्रवाडीतील बहिणीला भेटण्यासाठी निघाला होता. परदेशी यांना बस मिळेना. केशवदेखील शहरात चालल्याचे कळाल्याने त्यांनी त्याच्यासोबत जायचे ठरवले. सायंकाळी दुचाकीने निघाल्यानंतर साडेसात वाजेच्या सुमारास कांचनवाडीतील बेंच मार्कसमोरून जात असताना त्यांना पाण्याच्या टँकरचालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.

जीव वाचवण्याच्या प्रयत्नात केशवने दुचाकी बाजूला घेतली. रस्त्याचे काम सुरू असल्याने एकतर्फी वाहतुकीत समोरून आलेला दुचाकीस्वार त्यांना येऊन धडकला. समोरील दुचाकीचालक एका बाजूला तर विरुद्ध दिशेला केशवची दुचाकी पडली व मागून आलेला पाण्याचा टँकर केशवसह परदेशी यांच्या अंगावरून गेला. स्थानिकांनी धाव घेत गंभीर जखमी अवस्थेत त्यांना घाटीत नेले. मात्र, तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. अपघाताला कारणीभूत वाहनचालकांचा शोध सुरू असल्याचे सातारा पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी सांगितले.

मुलीसोबत शेवटचा संवाद अन् १३ कि.मी.वर मृत्यू
परदेशी यांच्या सहा मुलींनी शुक्रवारी भाऊबीजेच्या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. परदेशी यांच्या दोन मुली शहरात, दोन अहमदनगर, एक नाशिक, तर एक श्रीरामपूरला राहते. सर्व मुली, जावई, नातवंडे शुक्रवारी एकत्र येणार होते. त्यासाठी परदेशी गावाकडून निघाल्यानंतर शहरातील मुली त्यांच्यासोबत सातत्याने संपर्कात होत्या. बिडकीनला असताना मुलीने कॉल करून पैठण रस्त्यावर घेण्यास येत असल्याचे सांगितले. परंतु, तो संवाद दोघांमधला शेवटचा ठरला. तेथून १३ किमी अंतरावर परदेशी यांचा मृत्यू झाला. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यांचा मुलगा स्वित्झर्लंडमध्ये अभियंता आहे. वडिलांच्या निधनाचे वृत्त कळताच तोही तातडीने भारताकडे निघाला.

भाऊबीज कायमसाठी अपूर्ण
फार्मसीचे शिक्षण घेतलेला केशव आई, वडील, लहान भावासह गावाकडे राहत होता. त्याची विवाहित बहीण नक्षत्रवाडीला राहते. भाऊबीजेनिमित्त तो बहिणीकडे येत होता. मात्र, त्याचाही बहिणीच्या भेटीआधीच मृत्यू झाला. केशवच्या पार्थिवावर दुपारी, तर परदेशी यांच्या पार्थिवावर रात्री मुलगा आल्यानंतर अंत्यसंस्कार पार पडले.

Web Title: Put black on the young, old in Balam Takali; Brothers and sisters are forever separated for daughters and sisters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.