मरगळ झटकून शासकीय योजना मार्गी लावा; झेडपी ‘सीईओ’ यांचे विभागप्रमुखांना निर्देश

By विजय सरवदे | Published: May 22, 2024 11:50 AM2024-05-22T11:50:43+5:302024-05-22T11:51:00+5:30

मागील दीड महिने निवडणुकीची आचारसंहिता, निवडणूक कामांमुळे शासकीय योजनांची कामे लटकली आहेत.

Put the government scheme on high priority; Direction of ZP 'CEO' to head of department in coordination meeting | मरगळ झटकून शासकीय योजना मार्गी लावा; झेडपी ‘सीईओ’ यांचे विभागप्रमुखांना निर्देश

मरगळ झटकून शासकीय योजना मार्गी लावा; झेडपी ‘सीईओ’ यांचे विभागप्रमुखांना निर्देश

छत्रपती संभाजीनगर : गाव पातळीवर राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांचा आढावा घेतल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी निवडणुकीची कामे आणि आचारसंहितेमुळे आलेली मरगळ झटकून आता रेंगाळलेली कामे विहित कालावधीतच पूर्ण करा, असे निर्देश सर्व विभागप्रमुखांना मंगळवारी समन्वय सभेत दिले. 

समन्वय सभेमध्ये मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी पंतप्रधान आवास योजना, रमाई, शबरी, अटल कामगार घरकुल योजना, ‘उमेद’ ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत गणपती मूर्ती विक्री, बचत गटासाठी भांड्यांची खरेदी, मग्रारोहयोंतर्गत सिंचन विहिरी, विहीर पुनर्भरण, बांबू लागवड, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, महिला व बालकल्याण विभागाकडून कुपोषणमुक्त अभियान, बालविवाह रोखणे, आरोग्य विभागाकडून प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुका गुणांकन, पंचायत विभागाने राबविलेल्या पाणीपट्टी वसुली, विश्वकर्मा योजना, १५व्या वित्त आयोगाच्या निधीचा खर्च, ग्राम सुरक्षा यंत्रणा, सोलार योजना, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून हर घर जल, नळ जोडणी, पाणीटंचाई, सिंचन विभागाने हाती घेतलेल्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, शिक्षण विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या समूह शाळा तपासणी, पशुसंवर्धन विभागाकडून चारा टंचाईची सद्यस्थिती जाणून घेतली.

मागील दीड महिने निवडणुकीची आचारसंहिता, निवडणूक कामांमुळे शासकीय योजनांची कामे लटकली आहेत. दोन - चार दिवसांत आचारसंहिता शिथिल होईल. त्यामुळे सर्व विभागप्रमुखांनी मरगळ झटकून नियोजित कालावधीतच शासकीय योजनांची कामे पूर्ण करण्याचे विकास मीना यांनी निर्देश दिले.

या समन्वय सभेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) सुदर्शन तुपे, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मग्रारोहयो) अनुपमा नंदनवनकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) सुवर्णा जाधव आदींसह सर्व गटविकास अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठ्याचे उपअभियंता, गट समन्वयक, समूह समन्वयक, सहायक कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Put the government scheme on high priority; Direction of ZP 'CEO' to head of department in coordination meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.