मोटारसायकलवर बनावट क्रमांक टाकणे पडले पितापुत्राला पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:03 AM2021-09-13T04:03:12+5:302021-09-13T04:03:12+5:30
सागर सीताराम लिंगायत (१९, रा. माणिकनगर, भवन, सिल्लोड) आणि त्याचे वडील सीताराम काशीनाथ लिंगायत (४३) अशी गुन्हा नोंद झालेल्या ...
सागर सीताराम लिंगायत (१९, रा. माणिकनगर, भवन, सिल्लोड) आणि त्याचे वडील सीताराम काशीनाथ लिंगायत (४३) अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत. सिडको वाहतूक शाखेचे हवालदार अमोल शिवाजीराव काकडे हे ११ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता वोक्हार्ट टी पॉइंट येथे वाहतूक नियमन करीत होते. यावेळी त्यांना विचित्र नंबर प्लेट असलेला दुचाकीस्वार सागर लिंगायत यास पकडले. वाहनाची कागदपत्रे तपासली असता दुचाकीचा खरा क्रमांक एमएच २० एफए ५५८६ आढळून आला, तर दुचाकीवर एमएच २० एफए २१४ हा क्रमांक विचित्र पद्धतीने टाकलेला दिसला. याविषयी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने राम अक्षर यावे याकरिता त्याने हा नंबर टाकल्याचे उत्तर पोलिसांना दिले. त्याच्या वडिलांच्या नावे ही दुचाकी खरेदी केली आहे. दुचाकी खरेदी केल्यानंतर त्यांनी बनावट क्रमांक टाकल्याचे त्यांनी मान्य केले. याप्रकरणी काकडे यांच्या तक्रारीवरून पिता-पुत्राविरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
चौकट
परीक्षा असल्याने नोटीस देऊन सोडले
अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी असलेला सागर याची परीक्षा असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. यामुळे पोलिसांनी त्याच्यासह त्याच्या वडिलांना नोटीस बजावून पुढील तारखेला हजर होण्याचे सांगितले.