औरंगाबादमध्ये रिक्षा, टॅक्सीत लागणार ‘क्युआर कोड’ स्टिकर; प्रवास होणार अधिक सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 01:23 PM2018-01-17T13:23:53+5:302018-01-17T13:25:05+5:30
आरटीओ कार्यालयाने रिक्षा, टॅक्सीमध्ये ‘क्युआर कोड’ पद्धतीनुसार स्टिकर लावण्याची तयारी केली आहे. या स्टिकरद्वारे परवानाधारक, चालक, हेल्पलाइनची माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.
औरंगाबाद : आरटीओ कार्यालयाने रिक्षा, टॅक्सीमध्ये ‘क्युआर कोड’ पद्धतीनुसार स्टिकर लावण्याची तयारी केली आहे. या स्टिकरद्वारे परवानाधारक, चालक, हेल्पलाइनची माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.
रिक्षा, काळी-पिवळी, मीटर टॅक्सी या वाहनांतील प्रवास आता अधिक सुरक्षित होणार आहे. या प्रवासी वाहनांमध्ये परवानाधारक, चालकाचा फोटो, त्याचा पत्ता, मोबाईल क्रमांक, आपत्कालीन मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक आदी माहिती प्रवाशांना सहज दिसेल, अशा पद्धतीने लावण्याची सूचना सप्टेंबरमध्ये अप्पर परिवहन आयुक्तांनी आरटीओ कार्यालयास केली होती. यासंदर्भात प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीतही चर्चा करण्यात आली.
केंद्र शासनातर्फे आधार क्रमांक मोबाईल क्रमांकाशी जोडण्याची योजना अमलात आणण्यात आली आहे, त्याच धर्तीवर मोटार वाहन विभागाने वाहन नोंदणीच्या पद्धतीप्रमाणे ‘क्युआर कोड’चे स्टिकर तयार करण्याची तयारी केली आहे. आरटीओ कार्यालयात ५० रुपये शुल्क भरून हे स्टिकर दिले जातील. हे स्टिकर रिक्षा, टॅक्सीत लावण्याचे बंधनकारक करण्यात येणार आहे. याद्वारे रिक्षा, टॅक्सीमधून प्रवास करणा-या प्रवाशांच्या माहितीसाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी हे स्टिकर महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आरटीओ कार्यालयातर्फे सांगण्यात आले.