दर्जा अन् ऊर्जा वाढवणार
By Admin | Published: August 10, 2015 12:39 AM2015-08-10T00:39:40+5:302015-08-10T00:59:03+5:30
बीड : दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवत ग्रामसेवकांनी तत्पर सेवा देण्याचे निश्चित केले. त्यासाठी उर्जा व दर्जा वाढविण्याचाही संकल्प राज्य ग्रामसेवक युनियनच्या
बीड : दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवत ग्रामसेवकांनी तत्पर सेवा देण्याचे निश्चित केले. त्यासाठी उर्जा व दर्जा वाढविण्याचाही संकल्प राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने आयोजित स्रेह मेळाव्यात रविवारी करण्यात आला. यावेळी ग्रामसेवकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याध्यक्ष एकनाथराव ढाकणे यांनी दिली.
येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडलेल्या मेळाव्याचे उद्घाटन ढाकणे यांच्या हस्ते झाले. राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे, एस. बी. तांबोळी, प्रवीण पवार, शिवाजीराव खरात यांची प्रमुख उपस्थिती होती तर ग्रामसेवक संघटनेचे जेष्ठ नेते हनुमंतराव मुरूडकर अध्यक्षस्थानी होते. जिल्हाध्यक्ष नारायण बडे, सदस्य विलासराव देशमुख, सचिव संदीपान लेंडाळ, चेअरमन बाबूराव नन्नवरे व्यासपीठावर उपस्थित होते.
ढाकणे म्हणाले, ग्रामसेवकांना शासन व जनता यांच्यात समन्वय साधून काम करायचे असते. शासन योजना सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामसेवकांनी तत्पर रहावे, असे आवाहन त्यांनी केले. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे संघटनेने प्रलंबित मागण्या मांडल्या आहेत. त्यांच्यामार्फत ग्रामसेवकांचे प्रश्न सोडविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. ग्रामसेवकांवर जेथे कोठे अन्याय होईल, तेथे संघटना तातडीने धावून जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले.
जेष्ठ नेते मुरुडकर यांनी ग्रामसेवकांनी निडरपणे कामे करावीत असा सल्ला दिला. अन्याय खपवून न घेता एकजुटीने लढा द्या, असेही त्यांनी सांगितले. ‘ग्रामसेवकांसमोरील आव्हाने’ या विषयावर परिसंवादही पार पडला.
प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष नारायण बडे यांनी केले. त्यांनी संघटनेने केलेल्या कार्याचा अहवाल मांडला. तत्पूर्वी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी शेकडो ग्रामसेवकांनी हजेरी लावली. (प्रतिनिधी)