छत्रपती संभाजीनगर मनपाच्या शाळांमध्ये दर्जेदार सुविधा; कोट्यवधींचे टर्फ उभारण्यास सुरुवात

By मुजीब देवणीकर | Published: July 17, 2024 08:07 PM2024-07-17T20:07:27+5:302024-07-17T20:07:49+5:30

टर्फ मैदान उभारण्यासाठी जवळपास १ कोटींपर्यंत रक्कम खर्च होणार आहे.

Quality facilities in Chhatrapati Sambhajinagar Municipal Schools; Construction of multi-crore turf field started | छत्रपती संभाजीनगर मनपाच्या शाळांमध्ये दर्जेदार सुविधा; कोट्यवधींचे टर्फ उभारण्यास सुरुवात

छत्रपती संभाजीनगर मनपाच्या शाळांमध्ये दर्जेदार सुविधा; कोट्यवधींचे टर्फ उभारण्यास सुरुवात

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्वसामान्य पालकांच्या पाल्यांनाही दर्जेदार सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत, या दृष्टीने प्रशासक जी. श्रीकांत यांनी आधुनिक टर्फ संकल्पनेची अंमलबजावणी सुरू केली. शास्त्रीनगर, गारखेड्यातील प्रियदर्शनी शाळेत कामाला सुरुवात करण्यात आली. बायजीपुऱ्यातील चिमण्यांच्या शाळेत लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. टर्फ मैदान उभारण्यासाठी जवळपास १ कोटींपर्यंत रक्कम खर्च होणार आहे. ज्या ठिकाणी मोठे मैदान आहे, त्या ठिकाणीही टर्फ मैदान उभारले जाणार आहे.

महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांंनी १५ महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारला. त्यांनी पहिल्या दिवशीपासूनच मनपा शाळा, शैक्षणिक दर्जा, सोयी सुविधांना प्राधान्य दिले. त्यांच्या प्रयत्नांमुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या कमालीची घटली. जून महिन्यात मनपा शाळांमध्ये प्रवेशासाठी रांगा लागू लागल्या. काही ठिकाणी तर नो व्हॅकन्सीचे बोर्ड लावावे लागले. ६३ कोटी रुपये खर्च करून ५० पेक्षा अधिक शाळा अत्याधुनिक करण्यात आल्या. शहरात अनेक ठिकाणी खासगी तत्त्वावर टर्फ मैदान सुरू करण्यात आले. सायंकाळी या ठिकाणी क्रिकेटसह विविध खेळ खेळण्यासाठी गर्दी होऊ लागली. त्यामुळे आता मनपाच्या शाळांमध्येही टर्फ उभारण्याच्या कामांना प्राधान्य दिले जात आहे.महापालिकेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनपाच्या गारखेड्यातील प्रियदर्शनी शाळेत जवळपास १ एकर जागेवर ३६ लाख १७ हजार रुपये खर्च करून काम सुरू करण्यात आले. त्याप्रमाणे गारखेड्यातील शास्त्रीनगर येथील मनपा शाळेत ३३ लाख ३८ हजार रुपये खर्च करण्यात येत आहेत. बायजीपुरा येथील चिमण्यांची शाळा येथे १९ लाख रुपये खर्च करून टर्फ उभारले जाणार असून, याचे काम अजून सुरू झालेले नाही. ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत, तेथे एक महिन्यात काम पूर्ण होणार आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये जिथे सर्वाधिक विद्यार्थी आहेत, त्या ठिकाणीही टर्फचे मैदान उभारले जाणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड होईल
विद्यार्थी सध्या मोबाईलवरच जास्त वेळ घालवत असतात. त्यामुळे त्यांना मैदानी खेळाकडे ओढून आणणे खूप गरजेचे आहे. प्रशासक जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनानुसार शहरातील काही शाळांमध्ये टर्फचे मैदान उभारले जात आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी काही शाळांची निवड केली आहे.
- अंकुश पांढरे, उपायुक्त, मनपा.

Web Title: Quality facilities in Chhatrapati Sambhajinagar Municipal Schools; Construction of multi-crore turf field started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.