कामगारांना दर्जेदार आरोग्यसेवा; राज्यात ईएसआयसी रुग्णालयांमध्ये ३६ हजार बेडची व्यवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 03:51 PM2023-06-12T15:51:51+5:302023-06-12T15:52:12+5:30
१९७७ मध्ये लोकशाहीची हत्या झाली होती. आता लोकशाही समृद्ध आणि अधिक खुली झाली; केंद्रीय श्रम, रोजगारमंत्री भूपेंद्र यादव
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात कामगारांसाठी ईएसआयसी रुग्णालयांमध्ये फक्त १८ हजार बेड होते. मागील काही वर्षांत केंद्र शासनाने ही संख्या ३६ हजारपर्यंत नेली. यामध्ये आणखी वाढ करण्याचा आमचा मानस आहे. कामगारांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात हा त्यामागचा हेतू आहे. राज्यात ७ नवीन ईएसआयसी रुग्णालये सुरू केली जातील. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक क्षेत्रात २०० बेड, शेंद्रा येथे ३० बेडचे रुग्णालय १०० बेडपर्यंत नेण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली.
रविवारी सकाळी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. पंतप्रधान आवास योजना, जनधन योजना, शौचालये निर्मिती आदी योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी नागरिकांना फायदा मिळाला. देशभरात ५८ हजार किलोमीटरचे हायवे तयार करण्यात आले. ७४ नवीन एअरपोर्ट तयार केले. जगातील पाच प्रमुख देशांच्या अर्थव्यवस्थेत भारताचा समावेश झाला. छत्रपती संभाजीनगर शहरात पंतप्रधान आवास योजनेची अद्याप सुरुवातही न झाल्याबद्दल त्यांना थेट प्रश्न विचारल्यावर, स्थानिक नेते उत्तर देतील म्हणून त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले.
लोकशाहीच्या मुद्यावर त्यांना छेडले असता, १९७७ मध्ये लोकशाहीची हत्या झाली होती. आता लोकशाही समृद्ध आणि अधिक खुली झाल्याचे यादव यांनी नमूद केले. २०२४ मध्ये पुन्हा मोदी सरकार बहुमताने येईल. राज्यातही मुख्यमंत्री एकनाश शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चांगला विकास सुरू आहे. कर्नाटक निवडणुकीच्या पराभवाचे आम्ही आत्मचिंतन करू, येणाऱ्या प्रादेशिक निवडणुका जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे, आ. प्रशांत बंब, संजय केणेकर, शिरीष बोराळकर, समीर राजूरकर यांची उपस्थिती होती.