आयुर्वेद औषधीत अॅलोपॅथीची मात्रा; कंपनीविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 01:15 AM2017-08-24T01:15:33+5:302017-08-24T01:15:33+5:30
कामवर्धक आणि गुडघे दुखीवरील आयुर्वेद औषधात अॅलोपॅथी रसायनाची भेसळ करून ती संपूर्ण आयुर्वेदिक असल्याचे सांगून जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी अन्न व औषधी प्रशासन विभागाने दुकानदारासह दोन राजस्थानी औषध निर्मिती कंपन्यांविरुद्ध सिटीचौक ठाण्यात वेगवेगळे गुन्हे नोंदविले
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कामवर्धक आणि गुडघे दुखीवरील आयुर्वेद औषधात अॅलोपॅथी रसायनाची भेसळ करून ती संपूर्ण आयुर्वेदिक असल्याचे सांगून जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी अन्न व औषधी प्रशासन विभागाने दुकानदारासह दोन राजस्थानी औषध निर्मिती कंपन्यांविरुद्ध सिटीचौक ठाण्यात वेगवेगळे गुन्हे नोंदविले. या दुकानातून सुमारे ४० हजार रुपये किमतीची औषधी जप्त करण्यात आली.
सारंग अविनाश जोशी (गुलमंडी), प्रेमपालसिंग धुना (रा. गंगानगर, राजस्थान) अशी आरोपींची नावे आहेत. सिटीचौक पोलिसांनी सांगितले की, अन्न व औषधी विभागाचे निरीक्षक माधव निमसे यांना १४ सप्टेंबर २०१६ रोजी सुपारी हनुमान रोड येथील श्रीकृष्ण आयुर्वेदिक भांडार ३ एक्स गुटिका हे कामवर्धक आयुर्वेद औषध आणि मे. बिर्ला फार्मास्युटिकल्स कंपनीचे गुडघे दुखीवरील औषध म्हणून रुमाविन वटी विक्रीसाठी असल्याचे आढळले. या औषधाचे सॅम्पल त्यांनी जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. या दोन्ही सॅम्पलच्या तपासणीचा अहवाल प्रयोगशाळेकडून अन्न व औषधी प्रशासन विभागाला प्राप्त झाला. सेक्सवर्धक थ्री एक्स गुटिकामध्ये अॅलोपॅथिक सिल्डेनोफिल सायट्रेट हे घटकद्रव्याचे मिश्रण केलेले आढळले, तर रुमाविन वटीमध्ये निमेसुलाइड व डायक्लोफेनॉक सोडियम या अॅलोपॅथिक औषधाची मात्रा आढळली.
मान्यताप्राप्त औषध निर्माण कंपनीलाच अॅलोपॅथीच्या औषधी तयार करण्याचे अधिकार असल्याने निरीक्षक निमसे यांनी दुकानदार सारंग जोशी यांच्याकडे औषध कंपन्यांची माहिती विचारली. तेव्हा राजस्थानमधील गंगानगर येथील प्रेमपालसिंग धुना यांच्या कंपनीकडून कामवर्धक गुटिका तर रुमाविन वटी ही संतोषकुमार बिर्ला, नवीनचंद्र बिर्ला (रा. गंगानगर, राजस्थान) यांच्याकडून मागविली असल्याचे त्यांनी सांगितले. या दोन्ही कंपन्यांच्या संचालकांना तक्रारदार यांनी औषधी तयार करण्याचा परवाना सादर करण्याचे सांगितले असता दोन्ही कंपनीने त्यांना सदर औषधी त्यांच्या कंपनीची नसल्याचे दोन्ही तक्रारदार यांना कळविले. आरोपी हे कारवाई टाळण्यासाठी टोलवाटोलवी करीत असल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आले. यात आठ महिन्यांचा कालावधी उलटल्याने तक्रारदार यांनी अखेर २२ आॅगस्ट रोजी सिटीचौक ठाण्यात वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद केली. आरोपीच्या दुकानातून सुमारे ४० हजारांची औषधी जप्त केली.