तीन दारुड्यांमध्ये भांडण; एकाचा खून, दुसरा अत्यवस्थ, तिसरा अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 06:26 PM2022-06-21T18:26:55+5:302022-06-21T18:30:15+5:30
दलालवाडीतील घटना : दारू पिण्याच्या वादातून घडला प्रकार
औरंगाबाद : शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या दलालवाडी येथील एका अर्धवट बांधकामाच्या रिकाम्या जागेत दारू पीत बसलेल्या तिघांमध्ये वाद झाला. या वादातूनच एकाचा चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आला. दुसरा एक जण गंभीर जखमी झाला. घटना सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान,यातील तिसऱ्या संशयित मारेकऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रिजवान उल हक इम्रान उल हक (३२, रा. सिल्लेखाना परिसर), असे मृताचे, तर वसीम मुक्तार कुरेशी (२८, रा. दलालवाडी), असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. मोहसीन ऊर्फ हमला रमजानी कुरेशी (३०, रा. दलालवाडी), असे फरार संशयिताचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दलालवाडी भागात एका इमारतीचे बांधकाम अर्धवट राहिलेले आहे. सर्व बाजूंनी पत्र्याने जागा बंद केलेली आहे; पण आत जाण्यासाठी एका ठिकाणाहून रस्ता आहे. त्यातून तीन जण दारू, ‘चकणा’ आणि बसण्यासाठी मोठा रुमाल घेऊन गेले होते.
साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यातील फरार संशयिताने दोघांना भाेसकले. रिजवान उल हक याच्या छातीवर, कानावर, पायावर खोलवर वार करण्यात आले. रिजवान जागीच ठार झाला. वसीम कुरेशी हा गंभीर जखमी आहे. त्याच्याही छातीवर वार केलेले आहेत. त्याच्या छातीतून, नाका, तोंडातून प्रचंड रक्तस्राव झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या दोघांना मारणारा संशयित घटनेनंतर पसार झाला असून, त्याने मोबाइल बंद केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त विशाल ढुमे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, क्रांती चौकचे निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांनी पथकांसह घटनास्थळी धाव घेतली. यानंतर काही वेळात श्वान पथक, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे पथक दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत क्रांती चौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
चाकू अन् दारूचा भरलेला ग्लास
घटनास्थळावर खून करण्यासाठी वापरलेला चाकू, दारूने भरलेला ग्लास, पाण्याची बाटली आणि सोबत खाण्यासाठी आणलेली भेळ आढळून आली आहे. दारू प्यायल्यानंतर झालेल्या वादातून खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
मृतावर दोन गुन्हे दाखल
मृत रिजवान उल हक याचा हॉटेल आणि पानटपरीचा व्यवसाय आहे. हल्ला केल्याचे दोन गुन्हे त्याच्यावर क्रांती चौक ठाण्यात दाखल आहेत. मृत, जखमी आणि संशयित आरोपी हे तिघे मित्र असल्याची माहितीही नातेवाइकांनी दिली. संशयित आरोपीने दोन विवाह केलेले असून, दोन्ही घरी गुन्हे शाखेचे पथक जाऊन आले. आरोपीचा शोध गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक मनोज शिंदे, काशीनाथ महांडुळे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, गजानन सोनटक्के, अजित दगडखैर, रावसाहेब जोंधळे, क्रांती चौकचे उपनिरीक्षक विकास खटके यांची पथके घेत आहेत.