भांडण मोठ्यांचे; जीव गेला बिचाऱ्या कुत्रीचा, फावड्याचा घाव वर्मी लागला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 12:04 PM2023-02-01T12:04:06+5:302023-02-01T12:05:02+5:30

नारळीबाग येथील घटना : सिटी चौक ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी

Quarrel of the elders; The poor dog's life was lost in Aurangabad | भांडण मोठ्यांचे; जीव गेला बिचाऱ्या कुत्रीचा, फावड्याचा घाव वर्मी लागला

भांडण मोठ्यांचे; जीव गेला बिचाऱ्या कुत्रीचा, फावड्याचा घाव वर्मी लागला

googlenewsNext

औरंगाबाद : दोन कुटुंबांतील वादात सात पिलांची आई असलेल्या कुत्रीचा जीव गेल्याची घटना नारळीबाग येथे मंगळवारी दुपारी घडली. या प्रकरणी दोन्ही कुटुंबांनी दिलेल्या परस्परविरोधी तक्रारीनुसार सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संदीप भिसे, सचिन भिसे, अश्विनी भिसे, राणी भिसे (सर्व रा. नारळीबाग) अशी आरोपींची नावे आहेत. दरम्यान, भिसे यांच्या तक्रारीवरून रितिका निकाळजे, अमोल महाले, प्रीती कांबळे, सुनीता निकाळजे (सर्व रा. धनमंडी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला, अशी माहिती पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली. प्रीती कांबळे यांच्या फिर्यादीनुसार, ३१ जानेवारीला दुपारी आरोपी संदीप भिसे, सचिन भिसे, अश्विनी भिसे आणि राणी भिसे हे कांबळे यांच्या घरी गेले. तेव्हा कांबळे यांची पाळीव कुत्री त्यांच्यावर भुंकली. तेव्हा सचिन भिसे याने दांडा असलेले फावडे कुत्रीच्या डोक्यात मारून जखमी केले. त्यात कुत्री कोसळली. काही वेळातच कुत्रीचा जीव गेला. या कुत्रीने नुकताच सात पिलांना जन्म दिला होता. कुत्रीचा जीव घेतल्यानंतर भिसे कुटुंबीयांनी कांबळे यांच्यासह त्यांच्या नातेवाइकांना घरात घुसून मारहाण केली. तुम्ही आमची सुपारी दिली का?, रात्री आम्हाला लोकांनी मारहाण केली, असे म्हणत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी सिटी चौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

परस्परविरोधी तक्रारीवरून गुन्हा
या प्रकरणी सचिन भिसे यांच्या तक्रारीवरून रितिका निकाळजे, अमोल महाले, प्रीती कांबळे, सुनीता निकाळजे यांच्याविरुद्धही मारहाणीचा गुन्हा नोंदविला गेला आहे. ३० जानेवारीला रात्री ८ वाजता भिसे यांनी भाऊसाहेब खेत्रे यांना ‘राम-राम’ केला होता. त्या कारणावरून आरोपींनी भिसे यांच्यासोबत वाद घातला. त्यांना मारहाण केली. ३१ जानेवारीला दुपारी त्यांची पत्नी, वहिनी यांनाही आरोपींनी मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली.

Web Title: Quarrel of the elders; The poor dog's life was lost in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.