३०० मेट्रिक टन कचरा प्रक्रियेचा प्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 10:56 PM2019-01-19T22:56:57+5:302019-01-19T22:57:31+5:30
महापालिकेतर्फे चिकलठाण्यात उभारण्यात येत असलेल्या १५० मेट्रिक टन क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पास महावितरणने वेळेवर वीजपुरवठा केल्यास ३१ मार्च २०१९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र, पडेगाव आणि हर्सूल येथील प्रकल्पाची कूर्मगती पाहता हे दोन्ही प्रकल्प रद्द करण्याची नामुष्की मनपावर ओढावल्यास शहरातील ३०० मेट्रिक टन कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे.
औरंगाबाद : महापालिकेतर्फे चिकलठाण्यात उभारण्यात येत असलेल्या १५० मेट्रिक टन क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पास महावितरणने वेळेवर वीजपुरवठा केल्यास ३१ मार्च २०१९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र, पडेगाव आणि हर्सूल येथील प्रकल्पाची कूर्मगती पाहता हे दोन्ही प्रकल्प रद्द करण्याची नामुष्की मनपावर ओढावल्यास शहरातील ३०० मेट्रिक टन कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे.
शहराच्या कचराकोंडीला येत्या १६ फेब्रुवारीस एक वर्षे पूर्ण होणार आहे. मागील वर्षभरात महापालिकेने नेमके काय केले, असा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे. कचरा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेला महाराष्टÑ शासनाने तब्बल ९० कोटी रुपये दिले. खिशात पैैसा असूनही महापालिकेला वर्षभरात एकही कचरा प्रक्रिया प्रकल्प उभा करता आला नाही. चिकलठाण्यात एकमेव प्रकल्प उभा राहत आहे. त्याची क्षमता १५० मेट्रिक टन आहे. याच ठिकाणी १६ टन क्षमतेच्या दोन छोट्या मशीनही बसविण्यात आलेल्या आहेत. त्यातून दररोज ३२ मेट्रिक टन, असे एकूण १८२ मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया होईल.
पडेगाव येथे १५० मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प उभा करण्याचा प्रयत्न प्रशासनाचा होता; परंतु तेथे काम करू नये, असा निर्णय सामाजिक न्याय विभागाने दिला. स्थानिक नागरिकांचा या कचरा प्रक्रिया प्रकल्पास विरोध आहे.
हर्सूल येथे अत्याधुनिक पद्धतीने कचºयावर प्रक्रिया करण्याचे काम नागपूरच्या हायक्यूब कंपनीला देण्यात आले. दरावरून निर्माण झालेल्या वादामुळे हा प्रकल्पही आता रद्द झाल्यात जमा आहे. अशा परिस्थितीत महापालिका उर्वरित ३०० मेट्रिक टन कचºयाचे काय करणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पडेगाव येथे ३२ टन क्षमतेच्या छोट्या मशीन उभारणे, कांचनवाडीत ३० मेट्रिक टन क्षमतेचा बायोमिथेन प्रकल्प उभारण्यात येईल. १५० मेट्रिक टन सुका कचरा तयार होतो. त्याचे बेलिंग करण्यात येईल.
मायोवेसल्सकडून प्रक्रिया नाही
चिकलठाणा येथे सुक्या कचºयापासून बेलिंग तयार करणारी यंत्रणा उभारण्यात यावी, असे आदेश मागील महिन्यात मनपाने मायोवेसल्स या कंत्राटदार कंपनीला दिले होते. कंपनीने आजपर्यंत कोणतीच यंत्रणा उभारली नाही. कंपनीचे लाड न करता नोटीस बजावण्याचे आदेशही पदाधिकाºयांनी दिले होते.