बंधार्‍यांचा प्रश्न मार्गी लागणार

By Admin | Published: May 28, 2014 11:54 PM2014-05-28T23:54:06+5:302014-05-29T00:40:40+5:30

जालना : शिरपूर पद्धतीचे आठ बंधारे जालना शहरात बांधण्याच्या कामाला प्रशासकीय मान्यतेनंतर लवकरच प्रारंभ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

The question of the bonds will be solved | बंधार्‍यांचा प्रश्न मार्गी लागणार

बंधार्‍यांचा प्रश्न मार्गी लागणार

googlenewsNext

जालना : शिरपूर पद्धतीचे आठ बंधारे जालना शहरात बांधण्याच्या कामाला प्रशासकीय मान्यतेनंतर लवकरच प्रारंभ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिरपूर पॅटर्नचे जनक जलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर यांच्या मार्गदर्शनानुसार घाणेवाडी ते जालना दरम्यान कुंडलिका नदीवर यापूर्वीच दोन बंधारे लोकसहभागातून बांधण्यात आलेले आहेत. त्याचा परिणाम भूजल पातळी वाढण्यात झाला असून परिसरातील शेतकर्‍यांना, ग्रामस्थांना त्याचा फायदा होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. गतवर्षी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जालना दौर्‍यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शिरपूर पॅटर्नचे बंधारे बांधण्यासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आठ बंधार्‍यांसाठी आठ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली. कुंडलिका नदीवर नऊ कि़मी. अंतरावर हे बंधारे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी जलतज्ज्ञ खानापूरकर यांनी सर्व्हे करून ठिकाणेही निश्चित केलेली आहेत. आता या कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार यावर निर्णय घेण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी ए.एस. आर. नायक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, स्थानिक स्तर लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सत्तारखान, कृषी अधीक्षक उमेश घाटगे, उपअभियंता कांबळे यांच्यासह संबंधित विभागाच्या कर्मचार्‍यांची उपस्थिती होती. या बैठकीतून या बंधार्‍यांच्या अनुषंगाने अधिकार्‍यांनी आराखड्याची माहिती सादर केली. तसेच, बंधार्‍यांच्या अंदाजपत्रकासह उपयुक्ततेसंदर्भातही सविस्तर तपशील सादर केला. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी रखडलेल्या या कामासंदर्भात विचारणा केली. या बंधार्‍यांची कामे जलदगतीने पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. या बैठकीतून बंधार्‍याच्या अनुषंगाने तांत्रिक गोष्टींवरही चर्चा करण्यात आली. हे बंधारे अधिकाधिक शेतकर्‍यांसाठी उपयुक्त ठरावेत, तसेच ठिकठिकाणी बंधार्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी अडवून जमिनीतील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ व्हावी, असा सूर व्यक्त करण्यात आला. राज्य सरकारने या बंधार्‍यांसाठी सिद्धीविनायक ट्रस्टच्या माध्यमातून ८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या तरतूदीचा विनियोग अधिकाधिक काटेकोरपणे व्हावा, तसेच बंधार्‍यांच्या कामात पारदर्शकता असावी, असाही सूर या बैठकीतून व्यक्त करण्यात आला. यावेळी बंधार्‍यांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली. शिरपूर पद्धतीचे बंधारे हे ६० मीटर रूंद व तीन मीटर खोली राहणार आहे. त्यामुळे परिसरातील विहिरी तसेच हातपंपाची पाणीपातळी वाढण्यास मदत होऊन पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करता येणे शक्य आहे. (प्रतिनिधी) सरकारी पातळीवर अनेक अडथळे या बंधार्‍यासाठीचा निधी प्राप्त झाल्यानंतर या जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींनी समन्यायी पद्धतीने तो निधी संपूर्ण जिल्ह्यात बंधारे उभारण्यासाठी खर्च व्हावा, यासाठी मोठा आटापिटा केला होता. परंतु, लोकप्रतिनिधीचे हे हेतूत: प्रयत्न उधळून टाकण्यात आले. कठोर भूमिकेमुळे अनेक अडथळे झाले दूर कुंडलिका नदीवरील हे आठ बंधारे उभारण्यासंदर्भात सरकारी पातळीवरून अनेक अडचणी उभ्या करण्यात आल्या. विशेषत: काही ‘झारीतल्या शुक्राचार्यांनी’ त्यासाठी विशेष प्रयत्न केले. परंतु, जलतज्ज्ञ खानापूरकर यांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेतल्यानंतर अनेक अडथळे दूर झाले.

Web Title: The question of the bonds will be solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.