स्मशानभूमीच्या हद्दीचा प्रश्न पेटला; संतप्त नातेवाईकांचा मृतदेहासह ग्रामपंचायतीसमोर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2021 12:21 PM2021-12-27T12:21:55+5:302021-12-27T12:23:42+5:30
औरंगाबाद जिल्ह्यातील पिशोर येथील प्रकार : स्मशानभूमीची कायमस्वरूपी हद्द काढून देण्याची मागणी
पिशोर ( औरंगाबाद ) : गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमीच्या जागेवरून वाद होत असल्याने जागेची हद्द कायम करून द्यावी, या मागणीसाठी संतप्त होत नातेवाईकांसह समाजबांधवांनी पिशोर ग्रामपंचायत कार्यालयासमोर अंत्ययात्रा रोखून ठिय्या दिला. जोपर्यंत स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत अंत्ययात्रा येथून हलणारच नाही, असा पवित्रा घेतल्याने पिशोरमध्ये काही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पिशोरमधील दिगर भागातील शांताबाई सूर्यभान खडके (७२) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी रात्री निधन झाले. महानुभवपंथाच्या परंपरेनुसार भुईडाग दिला जातो पण भुईडाग देण्याच्या जागेच्या हद्दीवरून गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी वाद सुरू आहे. त्यामुळे शांताबाई यांचे अंत्यसंस्कार कसे करायचे यावरून समाजबांधवांमध्ये चर्चा झाली. विशेष म्हणजे या समस्येबाबत ग्रामपंचायतीकडे अनेकदा मागणीदेखील केलेली होती. रविवारी सकाळी शांताबाई खडके यांची अंत्ययात्रा घरापासून निघाली ती थेट पिशोर ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरच रोखली गेली.
संतापलेल्या नातेवाईकांसह समाजबांधवांनी मृतदेह ग्रामपंचायतीच्या आवारात ठेवला. अंत्यसंस्कार करण्यासाठी असलेल्या जागेवरून नेहमी वाद होत आहे. आम्हाला हद्द कायम करून दिली जात नाही. जोपर्यंत हद्दीचा प्रश्न सोडविला जाणार नाही, तोपर्यंत मृतदेह हलविणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. त्यामुळे ग्रामपंचायतीसमोर काही काळ तणाव निर्माण झाला होता. ग्रामपंचायत पदाधिकारीही समोर येईनात. काही लोक प्रश्न मार्गी लागेल, अशी समजूत घालून अंत्यसंस्कार उरकून घ्यावा, अशी विनंती करत होते. परंतु संतप्त समाजबांधवांसह नातेवाईकांनी कोणाचेही एक ऐकले नाही.
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली मध्यस्थी
ग्रामपंचायतीसमोरच मृतदेह ठेवल्याने ग्रामस्थांनी गर्दी जमली होती. तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने काही लोकांनी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना फोनवरून माहिती दिली. जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तहसीलदारांशी संपर्क साधून अनेक वर्षांपासून हा प्रश्न रखडला आहे. कायम वाद होत असल्याने यावर त्वरित तोडगा काढावा, अशी विनंतीवजा सूचना केली. त्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी अंत्यविधी आटोपून घ्यावा, अशी विनंती नातेवाईकांना केली. त्यानंतर नातेवाईकांनी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार विधी पार पाडला.