चेकपोस्टवरील पोलिसांच्या तपासणीवर प्रश्नचिन्ह

By Admin | Published: September 23, 2014 11:08 PM2014-09-23T23:08:28+5:302014-09-23T23:23:35+5:30

वसमत : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसमत मतदारसंघातील चेकपोस्ट व पोलिसांच्या ‘सरप्राईज’ चेकींग मोहिमेत आजपर्यंत ३ वेळेस वाहनांत रोख रक्कम सापडली.

Question check on police checkpost | चेकपोस्टवरील पोलिसांच्या तपासणीवर प्रश्नचिन्ह

चेकपोस्टवरील पोलिसांच्या तपासणीवर प्रश्नचिन्ह

googlenewsNext

वसमत : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसमत मतदारसंघातील चेकपोस्ट व पोलिसांच्या ‘सरप्राईज’ चेकींग मोहिमेत आजपर्यंत ३ वेळेस वाहनांत रोख रक्कम सापडली. चेकपोस्टवरील तपासणीत जशी रोख ेरक्कम सापडत आहे तसे दारु, चंदन, रेशनचे धान्य, रॉकेलची आवक, जावक करणारे एखादे वाहन मात्र सापडलेले नाही. यावरुन चेकपोस्टवर फक्त ‘नगदी’वरच लक्ष केंद्रित आहे की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
वसमत तालुक्यातील जिंतूर फाटा, हट्टा फाटा व साळवा टी पॉईंटवर चेकपोस्ट लावण्यात आले आहेत. वसमत-नांदेड रोडवरील चोंढी फाटा, नागेशवाडी फाटा, हट्टा फाट्यावर १२ महिने पोलिसांचे तपासणी पथक जागता पहारा देते. येथे कर्मचारी फाट्यावरील कर्तव्यासाठीच ओळखले जातात, एवढे ते तरबेज आहेत. तालुक्यात चंदन तस्करी, रॉकेल, स्वस्त धान्यांचा काळा बाजार, अवैध दारूविक्री व गुटख्याचा खुलेआम व्यापार करण्याचे सुरक्षित केंद्र समजले जाते. काळाबाजार करणारे हे वाहनाद्वारे व्यवहार करतात. त्यांना राष्ट्रीय महामार्गावरूनच वाहने न्यावी-आणावी लागतात. स्वस्त धान्य नांदेडमार्ग हैदराबादकडे रवाना होते. खाजगी वाहनांद्वारे नांदेड, हैदराबादकडून गुटखा वसमत येथे येतो. अवैध दारूची ने-आणही या मार्गावरूनच होते. मात्र आजवर जिंतूर टी पॉईंट व अन्य चेक नाक्यांवर एकदाही कशी वाहने सापडली नाहीत, हे विशेष.
लोकसभेच्या निवडणुकीवेळी चेकपोस्टवर असे काही हस्तगत झाल्याचे वृत्त नाही. आता विधानसभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा तपासणी नाके, चेकपोस्टवर आॅन कॅमेरा चेकींग आहे. तालुक्यात आठ दिवसांत तीन वेळेस खाजगी वाहनातून जाणारी रोख रक्कम पकडली गेली. तिन्हीही घटनांत व्यापाऱ्यांचेच पैसे चेकींगमध्ये सापडले. एवढी चोख तपासणी होत असताना वसमतमध्ये ट्रकद्वारे येणारी दारूची धरपकड किवा तपासणी झालेली नाही. दुचाकीवरून राष्ट्रीय महामार्गावरून प्रत्येक गावात जाणारी दारूची खोकेही सापडले नाहीत. वसमतमधून रेशनचे धान्य जिंतूर टी पॉईंटवरून जात असते, तेही सापडले नाही. कुरूंदा भागातून चंदन तस्करांच्या टोळ्या राज्यभरात चंदन पाठवतात. ते चंदनही हाती लागले नाही. रॉकेलचीही धरपकड झाल्याचे ऐकिवात नाही. हवालामार्गे कोट्यवधींचे व्यवहार होतात, असे म्हटले जाते. अशा हवालाची रक्कम घेऊनही जाणारी एखादी लक्झरी बस चेक झाली की नाही, हे समजण्यास मार्ग नाही. कायद्यानुसार नाक्या-नाक्यांवर कडक तपसणी सुरू झाल्याने लहानसहान व्यापार करणारे व्यापारी व खजगी कामांसाठी लाख दोन लाख रूपये घेऊन ये-जा करणारे प्रचंढ धास्तावले आहेत. तसे अवैध व्यवसाय करणाऱ्यांची वाहनेही आॅन कॅमेरा तपासणीत सापडतील व निवडणुकीच्या निमित्ताने का होईना अवैध व्यावसायिकांच्या कारवाया कॅमेराबद्ध होतील, अशी अपेक्षा होती. मात्र आजवर तशी घटना घडलेली नाही. लोकसभा निवडणूक काळात असे निरंक राहिले तशीच स्थिती विधानसभेची राहते की काय, हे पाहणे रंजक ठरणार आहे. यासंदर्भात जिंंतूर टी पॉईंटवरील एसटी पथक प्रमुख गणेश पवार यांच्याशी संपर्क साधून आजवर एखादे दारूचे, चंदनाचे, धान्याचे वाहन सापडले का? असे विचारले असता त्यांनी आजवर तसे काही सपडले नसल्याचे सांगितले.
यावरून वसमत तालुक्यात गुटखा येणे बंद झाले. चंदन, धान्य व रॉकेलचीही तस्करी बंद आहे, असे समजावे लागणार आहे. नाहीतर चेकपोस्टवर केवळ नगदीवर लक्ष केंद्रित करून इतर बाबींकडे दुर्लक्ष तरी होत असावे, असेच म्हणावे लागणार आहे. एकंदर चेकपोस्टच्या तपासणीवर प्रश्नचिन्ह आहे. (वार्ताहर)

Web Title: Question check on police checkpost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.