मराठवाड्यात शरद पवार गटाच्या अस्तित्वाचा प्रश्न; १५ जागा लढवून केवळ एकच आमदार
By नजीर शेख | Published: November 28, 2024 12:15 PM2024-11-28T12:15:12+5:302024-11-28T12:17:37+5:30
मराठवाड्यात अजित पवार गटाकडे धनंजय मुंडे यांच्यासारखे आक्रमक आणि जनतेचा पाठिंबा असलेले नेतृत्व आहे. एकमेव आमदार संदीप क्षीरसागर हे अद्याप पक्षाचे मराठवाड्याचे नेतृत्व करू शकतील एवढे परिपक्व नाहीत.
छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने ४६ पैकी १५ जागा लढवत केवळ एकच जागा जिंकली आहे. भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाढलेल्या प्रचंड ताकदीपुढे पक्षाच्या मराठवाड्यातील अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मराठवाड्यावर माझे विशेष प्रेम आहे, असे सातत्याने सांगणाऱ्या शरद पवार यांच्या पक्षाला २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील आठ पैकी बीडची एक जागा वाट्याला आली होती. त्यामध्ये पक्षाचा विजय झाला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसने मराठवाड्यात काँग्रेससोबत आघाडी करीत २३ जागा लढविल्या होत्या. त्यामध्ये पक्षाने ८ जागा जिंकून आपला प्रभाव कायम ठेवला होता. २०१४ मध्येही राष्ट्रवादी काँग्रेसने ८ जागा जिंकल्या होत्या. यंदा सात जिल्ह्यांत पक्षाचा आमदार नाही. बीडमध्ये एकमेव संदीप क्षीरसागर आमदार आहेत.
पक्ष स्थापनेपासून मराठवाड्याने राष्ट्रवादी काँग्रेसला चांगली साथ दिली आणि पक्षाचे चांगले नेटवर्कही तयार झाले. मात्र, २०२३ मधील पक्षातील उभ्या फुटीनंतर अजित पवार यांच्याकडे पक्षातील विधानसभेचे सहा आणि विधान परिषदेतील दोन आमदार गेले, तर शरद पवार गटाकडे दोन आमदार राहिले. यामुळे शरद पवार गटाची ताकद कमी झाली. असे असले तरी महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यामध्ये आठपैकी सात जागा मिळाल्याने पक्षाचा आत्मविश्वास वाढला होता. विधानसभेतही चमकदार कामगिरी होण्याची पक्षाला अपेक्षा होती. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीने पक्षाच्या अपेक्षेवर पूर्णपणे पाणी फेरले गेले.
आमदारांची संख्या कमी असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पक्षाला चांगला प्रभाव टाकता येण्याची शक्यता नाही. स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत सत्तेत असणाऱ्या अजित पवार गटाकडे तिकिटासाठी गर्दी होऊ शकते. हाही मोठा धोका शरद पवार गटासमोर आहे. २०२९ च्या लोकसभा निवडणुका होण्यास आणखी साडेचार वर्षे आणि विधानसभा निवडणुकीसाठी पूर्ण पाच वर्षे बाकी आहेत. यामुळे आगामी काही वर्षांत पक्षाच्या मराठवाड्यातील अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
नेतृत्व कोण करणार ?
मराठवाड्यात अजित पवार गटाकडे धनंजय मुंडे यांच्यासारखे आक्रमक आणि जनतेचा पाठिंबा असलेले नेतृत्व आहे. एकमेव आमदार संदीप क्षीरसागर हे अद्याप पक्षाचे मराठवाड्याचे नेतृत्व करू शकतील एवढे परिपक्व नाहीत. राजेश टोपे आणि काही प्रमाणात सतीश चव्हाण हे नेतृत्वक्षम चेहरे शरद पवार गटाकडे आहेत. मात्र, हे दोघेही विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने त्यांच्याच अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शरद पवार गटाचे मराठवाड्यात नेतृत्व कोण करणार, असाही प्रश्न आहे.