पाकिस्तानसोबतचा प्रश्न चर्चेतूनच मिटेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 12:27 AM2017-09-07T00:27:51+5:302017-09-07T00:27:51+5:30
सीमेवर युद्धाच्या तयारीनिशी आलेल्या चीनसोबत चर्चा होऊ श्कते तर पाकिस्तानशी चर्चा का नाही, असा प्रश्न उपस्थित करीत भारत-पाकिस्तानमधील संबंध हे चर्चेद्वारेच सुधारतील असा विश्वास जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: सीमेवर युद्धाच्या तयारीनिशी आलेल्या चीनसोबत चर्चा होऊ श्कते तर पाकिस्तानशी चर्चा का नाही, असा प्रश्न उपस्थित करीत भारत-पाकिस्तानमधील संबंध हे चर्चेद्वारेच सुधारतील असा विश्वास जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी व्यक्त केला.
फारुख अब्दुल्ला हे बुधवारी नांदेडमध्ये श्री सचखंडगुरुद्वारा येथे दर्शनासाठी आले होते. नांदेडमध्ये श्री सचखंड गुरुद्वाराचे दर्शन घेण्याची आपली अनेक दिवसांपूर्वीची इच्छा होती ती आज पूर्ण झाली. येथे आल्यानंतर मोठे समाधान झाल्याचे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारत-पाकिस्तानमधील संबंधांमुळे आज काश्मीर घाटीत अशांतता आहे. परिणामी काश्मीरचा विकास रखडला आहे. भारत-पाकिस्तानचे संबंध चर्चेतूनच सुटतील. दोन्ही देश एकमेकांचे शेजारी आहेत. जगात सर्व काही बदल होऊ शकतो मात्र शेजारी बदलता येत नाही, असेही ते म्हणाले. सीमेवर उभ्या असलेल्या चीनसोबत भारत चर्चा करत आहे. मग पाकिस्तानशी चर्चा नको? असा सवालही त्यांनी व्यक्त केला.
देशातील आजच्या परिस्थितीवर त्यांनी चिंता व्यक्त करताना देशात आज लोकांना जोडण्याऐवजी तोडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी धर्माचा वापर होत आहे. ही बाबही अत्यंत गंभीर असल्याचे ते म्हणाले. धर्माचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. त्यात कुणीही हस्तक्षेप करु नये असेही ते म्हणाले. देशात झालेल्या नोटाबंदीमुळे आतंकवाद्यांना मिळणारी मदत बंद होईल, अशी घोषणा सरकारने केली होती. मात्र आजही आतंकवादी देशात सर्वसामान्यांचा बळी घेत आहेत. नोटाबंदीच्या माध्यमातून किती काळा पैसा बाहेर आला हे सरकारने घोषित करावे, असे सांगताना अब्दुल्ला यांनी नोटाबंदीतून सामान्यांचेच मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. काश्मीर हा भारतातच भाग असून या भागात भारतातीलच नागरिक येण्यास धजत नाहीत. देशातील नागरिकांनी येथे ये-जा केल्यास काश्मिरींमध्येही विश्वासाची भावना बळावेल. काश्मीरमध्ये भारतीयांनी येण्याचे आवाहनही त्यांनी केले.