कडबा महागल्याने सव्वाआठ लाख गुरांच्या जगण्याचा प्रश्न ऐरणीवर
By Admin | Published: July 14, 2015 12:43 AM2015-07-14T00:43:45+5:302015-07-14T00:51:09+5:30
राजेश खराडे , बीड पावसाने ओढ दिल्याने आठ दिवसाच्या कालावधीतच कडब्याचे दर दुपटीने वाढले आहेत. शेतकऱ्यांकडून लागेल तेवढ्याच कडबा चाऱ्याची खरेदी केली जात
राजेश खराडे , बीड
पावसाने ओढ दिल्याने आठ दिवसाच्या कालावधीतच कडब्याचे दर दुपटीने वाढले आहेत. शेतकऱ्यांकडून लागेल तेवढ्याच कडबा चाऱ्याची खरेदी केली जात आहे. हिरवा चारा तर दुरापास्तच झाला आहे.
ऐन पावसाळ्यातही हिरवा चारा तर सोडाच वाळलेला कडबा देखील मिळने मुश्किल झाले आहे. आठ दिवसापुर्वी १४०० रुपये शेकडा कडब्याचे दर होते. सबंध आठवडा जिल्ह्यात पावसाचा थेंबही न पडल्याने भीषण चाराटंचाई निर्माण झाली आहे. पावसाने उघडीप दिल्याने धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी कडबा खरेदीसाठी हात आखडता घेतला आहे. परिणामी आवक घटल्याने कडब्याचे दर सध्या अडीच ते तीन हजाराच्या घरात गेले आहेत. जिल्ह्यातून तर कोणत्याच चाऱ्याची आवक होत नाही त्यामुळे व्यापाऱ्यांना उस्मानाबाद, भूम, परंडा तर सोलापूर, बार्शी या ठिकाणाहून आयात करावी लागत असल्याचे येथील व्यापाऱ्याने सांगितले. दिवसाला येथील बाजारपेठेत ३ ते ४ हजार कडब्याची आवक होत आहे. मात्र ठोक व्यवहार तर बंद झाले आहेत. शेतकरीही लागेल तसे कडब्याची खरेदी करीत आहे. हिरव्या चाऱ्याची तर बाजारपेठच बंद झाली आहे.
चाराच शिल्लक नाही
जिल्ह्यातील कोणत्याच तालुक्यातून चाऱ्याची आवक होत नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना इतर जिल्ह्यातून मागणी करावी लागत आहे. वाहतूकीस होणाऱ्या खर्चाचा परिणाम देखील चाऱ्याच्या दरावर झाला आहे.
वाहतूकीच्या खर्चाचा परिणाम
पावसाळ्यात जनावरांना हिरवा चारा उपलब्ध असतो. मात्र यंदा भयावह परिस्थती निर्माण झाल्याने पावसाळ्यातही चारा नसल्याने जनावर दावनीला बांधण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली आहे. जनावरे बांधून असल्याने दिवसाला एका जनावरास ५ ते ६ कडब्याच्या पेंड्या लागत आहेत. पाऊस पडेल या आशेने आठवडाभर पुरेल एवढ्याच चाऱ्याची खरेदी करीत असल्याचे शेतकरी अशोक गर्जे यांनी सांगितले.