प्रश्न पडतात तिथेच लोकशाही असते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 07:30 PM2019-04-20T19:30:15+5:302019-04-20T19:30:57+5:30
‘सार्वत्रिक निवडणुका’ विषयावर विविध मान्यवरांचे मनोगत
औरंगाबाद : देशात लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे. दोन टप्प्यांत मतदान झाल्यानंतरही अनेकांना या निवडणुकीत काय चालले आहे, कोणाचे सरकार येणार, याविषयी संभ्रम आहे. सगळीकडे संशयाचे वातावरण असताना सर्वसामान्य, आदिवासी, शेतकरी, निम्न मध्यमवर्गीय नागरिकांनी निवडणूक हातात घेतली आहे. आमच्या पोटाचे काय, हा प्रश्न विचारत आहेत. ज्याठिकाणी प्रश्न पडतात, विचारले जातात त्याठिकाणीच लोकशाही अस्तित्वात असते, असे मनोगत विविध मान्यवरांनी परिसंवादात व्यक्त केले.
महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात कॉ. चंद्रगुप्त चौधरी स्मृती समितीतर्फे ‘सार्वत्रिक निवडणुका’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार डॉ. हेमंत देसाई होते. यात पत्रकार अमेय तिरोडकर, संजय आवटे यांनी सहभाग नोंदवला. व्यासपीठावर के.एम. ठिगळे, देवीदास तुळजापूरकर यांची उपस्थिती होती. तिरोडकर म्हणाले, राज्यातील १६ जिल्ह्यांतील विविध ठिकाणांना भेटी दिल्यानंतर समजले की, प्रसारमाध्यमांनी दुर्लक्षित ठेवलेला मोठा समाज पोटाच्या, जगण्याच्या प्रश्नामुळे अडचणीत सापडलेला आहे. विद्यमान सरकारने पाच वर्षे ‘नॉन इश्यू’ चर्चेत ठेवून शेतकरी, दलित, आदिवासी, निम्न मध्यमवर्गीयांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले. त्याच वर्गाने ही निवडणूक हाती घेतली आहे.
नागपूरमध्ये निवडणुकीच्या १५ दिवस आधी वातावरण नितीन गडकरी निवडून येणार असेच होते. मात्र निवडणूक झाल्यानंतर गडकरी पडणार, अशी चर्चा होत आहे. विशिष्ट घटकांकडे सर्वांनीच केलेले दुर्लक्ष हेच कारण आहे. याचवेळी ही निवडणूक जात या केंद्राशी संलग्न झाली आहे. २००९ ची निवडणूक प्रांतवादावर लढली गेली. २०१४ साली धर्माच्या नावावर निवडणुका झाल्या. यावर्षी जातीवर केंद्रित झाली आहे. त्यात महाराष्ट्रापासून कर्नाटक, गुजरात, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार अशा मोठ्या राज्यांचा समावेश असल्याचे निरीक्षण तिरोडकर यांनी नोंदवले. तसेच बेरोजगारी, नोकरी, शेतीमालाला भाव अशा प्रश्नांमुळे बालाकोटचा हल्ला मागे पडल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन देवीदास तुळजापूरकर यांनी केले.
समस्यांना हात घातल्याने आपुलकीची भावना
अध्यक्षीय समारोपात डॉ. हेमंत देसाई म्हणाले, विद्यमान सरकारचा विरोध करण्यासाठी विरोधी पक्षांकडे नियोजनाचा आभाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याठिकाणी जातात त्या भागातील देव-देवता, समस्यांना हात घालत आहेत. यातून संबंधित नागरिकांमध्ये आपुलकीची भावना दिसून येते. मात्र, त्या विरुद्ध दिशेने विरोधकांचा प्रवास सुरू आहे. मोदी निवडून येऊ नयेत, अशी मांडणीच होताना दिसत नाही, असेही डॉ. देसाई यांनी सांगितले.