पैठणमध्ये शेवगावमार्गे येणारा सव्वा क्विंटल गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 06:28 PM2019-09-25T18:28:19+5:302019-09-25T18:30:29+5:30
शेवगाव येथून रोज ३ क्विंटल गुटख्याचा पुरवठा
पैठण (औरंगाबाद) : पैठण-शेवगाव हद्दीवर लावण्यात आलेल्या निवडणूक चेकपोस्टवर पोलीसांनी कारमधून पैठण शहरात आणला जाणारा ९०,००० हजार रूपयाचा सव्वा क्विंटल गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी शेवगाव येथील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
बुधवारी सकाळी शेवगाव येथून पैठणकडे येणाऱ्या एम एच २४ एक्स ५७२१ या क्रमांकाच्या कारला पैठण हद्दीत निवडणूक विभागाने लावलेल्या चेकपोस्ट वर पोलिसांनी अडवून कारची तपासणी केली. तपासणीत सव्वा क्विंटल गुटखा चार गोण्यात भरलेला आढळून आला. मोहसिन असलम पठाण वय ३० वर्षे, सलमान सलीम पठाण वय २४ वर्षे, वशीम अशुलाल सय्यद वय ३२ वर्षे, व सय्यद अकीब सय्यद शफिक वय २२ वर्षे, सर्व राहणार, नाईकवाडी मोहल्ला, शेवगाव.जि.अहमदनगर हे चार आरोपी हा गुटखा कारमधून पैठण शहरात घेऊन जात होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे, पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार साहेबराव गिरासे पोलीस कॉन्स्टेबल लालचंद नागलोत, भाऊसाहेब वैद्य, राजू बर्डे, व दत्तात्रय इंगळे यांच्या पथकाने चारही आरोपींना ताब्यात घेऊन कार जप्त केली.गुटखा जप्त केल्यानंतर ही खबर अन्न व औषध प्रशासनास देण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी ज्योत्स्ना जाधव यांनी या बाबत भारतीय दंड संहिता व अन्न सुरक्षा माणके कायदा २००६ नुसार पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून ठाणे अंमलदार राजू जावळे यांनी चारही आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शेवगाव येथून रोज ३ क्विंटल गुटख्याचा पुरवठा
शेवगाव येथून पैठण शहरातील नाकारोड व श्रीनाथ हायस्कूल शेजारी असलेल्या एका दुकानात गुटखा येतो. तेथून पैठण तालुक्यातील विविध गावात या रेडिमेड गुटखा पुरवठा केला जातो. तालुक्यातील विविध गावातील दुकानदार येथून सकाळीच गुटखा घेऊन जातात. दररोज तीन ते चार लाखाची आर्थिक उलाढाल या व्यवहारातून होत असल्याची चर्चा होत आहे. शहरात कार्बाईड ने पिकवलेली केळी पुरवठा केला जातो. अन्न व औषध प्रशासनाचे मात्र या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष झाले असल्याने पैठण शहरातील सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.