विद्यापीठात विज्ञान दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 12:18 AM2019-02-26T00:18:44+5:302019-02-26T00:18:56+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विज्ञान विभागातर्फे विज्ञान दिनानिमित्त दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती पत्रकार परिषदेत समन्वयक डॉ. गुलाब खेडकर यांनी दिली
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विज्ञान विभागातर्फे विज्ञान दिनानिमित्त दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती पत्रकार परिषदेत समन्वयक डॉ. गुलाब खेडकर यांनी दिली. या कार्यक्रमाचे उद्घाटन २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता सिफार्ट सभागृहात होईल.
विद्यापीठात विज्ञान दिनानिमित्त मागील पाच वर्षांपासून प्रत्येक विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी प्रत्येक विभागात कार्यक्रम न होता सर्वांचा मिळून एकत्रित कार्यक्रम आयोजित केला आहे. भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण यांचा शोध असलेल्या ‘रमण इफेक्ट’च्या निमित्ताने २८ फेब्रुवारी हा विज्ञान दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने विद्यापीठातील विज्ञान विद्याशाखेत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधनात आवड निर्माण व्हावी, संशोधकांचे कौतुक करण्याच्या हेतूने स्पर्धांचे आयोजन केल्याचे नियोजन समितीचे सदस्य डॉ. बापू शिंगटे यांनी सांगितले. यानिमित्त आयोजित स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २७ फेब्रुवारीच्या संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करावी लागेल. यात लाईफ अॅण्ड इनव्हायरमेंट, केमिकल अॅण्ड फार्मास्युटिकल, फिजिक्स अॅण्ड स्मार्ट मटेरियल आणि कॉम्प्युटर अॅण्ड मॅथेमॅटिकल सायन्सेस विभागात स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धांमध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन, विद्यार्थ्यांचे सेमिनार, पोस्टर प्रदर्शन, शोधनिबंध आदींचा समावेश आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विभागातून प्रत्येकी तीन पारितोषिके देण्यात येतील. ही पारितोषिके पहिला, दुसरा क्रमांक न काढता त्या- त्या विषयातील प्रसिद्ध शास्त्रज्ञांच्या नावाने देण्यात येणार असल्याचे डॉ. शिंगटे यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये १ मार्च २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या काळात प्रकाशित झालेल्या विद्यार्थ्यांना शोधनिबंध स्पर्धेत सहभागी होता येईल. या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहनही संयोजन समितीतर्फे करण्यात आले. या पत्रकार परिषदेला संयोजन समितीचे सदस्य डॉ. बी. बी. वायकर, डॉ. विक्रम खिलारे, डॉ. प्रभाकर उंदरे उपस्थित होते.
---------------