मिनी घाटीने रेबीज ठरवून घाटीत पाठविलेला रुग्ण निघाला दारुडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 04:25 PM2019-07-09T16:25:32+5:302019-07-09T16:33:10+5:30
घाटीत दाखल केल्यानंतर केले वॉर्डातून पलायन
औरंगाबाद : चार दिवसांपूर्वी कुत्र्याने चावा घेतलेल्या रुग्णाने सोमवारी चिकलठाणा येथील मिनी घाटीत चांगलाच गोंधळ घातला. रुग्णाच्या वर्तणुकीमुळे डॉक्टरांनी त्याला थेट रेबीजमुळे रुग्ण पिसाळल्याचे ठरवून त्याला घाटीत पाठविले. मात्र, या रुग्णाने अतिमद्यमान केल्याचे घाटीत निदान झाले. त्यामुळे मिनी घाटीतील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
एका रुग्णाला सकाळी १० वाजेच्या सुमारास त्याच्या मित्रांनी उपचारासाठी चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणजे मिनी घाटीत आणले होते. रुग्णालयात आणल्यानंतर अचानक त्याने जोरजोरात ओरडणे, इतरांच्या अंगावर धावणे, दात चावणे, गुडघ्यावर चालणे सुरूकेले. या घटनेमुळे संपूर्ण रुग्णालयात गोंधळ उडाला. डॉक्टर, परिचारिक ांबरोबर इतर रुग्ण घाबरले. बाह्यरुग्ण विभागातील रुग्ण इकडून तिकडे पळत होते. जवळपास २० मिनिटे हा गोंधळ सुरूहोता. त्यामुळे बाह्यरुग्ण सेवाही विस्कळीत झाली. अखेर सुरक्षारक्षकांनी चादर टाकून रुग्णाला ताब्यात घेत एका कक्षात बंद केले. या रुग्णाने एका सुरक्षारक्षकाच्या अंगाला नखाने ओरखडले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या रुग्णाला कुत्र्याने चावा घेतला होता. त्याच्या वर्तणुकीवरून तो पिसाळलेला रेबीजचा रुग्ण म्हणून डॉक्टरांनी त्याला तात्काळ घाटीत पाठविले.
त्याने पाणी पिले अन्...
रेबीजचा रुग्ण आल्याने घाटी रुग्णालयाने उपचाराची तयारी केली; परंतु तेथेही तो गोंधळ घालत होता. मेडिसिन विभागातील वॉर्डात दाखल करताना सदर रुग्णाने अर्धी बाटली पाणी पिले. रेबीजच्या रुग्णांना पाण्याची भीती वाटते. त्यामुळे डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याने अतिमद्यपान केल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यावर अतिमद्यपानाचे उपचार करण्यात आले. हा रुग्ण दुपारी ३ वाजेच्या सुमारास वॉर्डातून गायब झाला. याविषयी वॉर्डातील डॉक्टरांनी सीएमओंना माहिती दिली.
नावाचा गोंधळ
जिल्हा रुग्णालयाने सदर रुग्णाचे नाव कुंडलिक मोरे (३५, रा. राजनगर) असे सांगितले, तर घाटी रुग्णालयात सुनील कुंडलिक मोरे अशी नोंद असल्याची माहिती मेडिसिन विभागातर्फे देण्यात आली.
अतिमद्यपान केलेला रुग्ण
जिल्हा रुग्णालयातून रेबीजचा रुग्ण म्हणून त्याला घाटीत पाठविले होते. मात्र, त्याने अतिमद्यपान केल्याचे आढळले. त्याच्यात रेबीजची लक्षणे नव्हती. त्याच्यासोबतचे नातेवाईकही ‘प्यायलेले’ होते. दुपारी तो वॉर्डातून अचानक गायब झाला. पोलिसांकडून त्याचा तपास केला जाईल.
- डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, विभागप्रमुख, मेडिसिन विभाग, घाटी
डॉक्टरांना दिसली लक्षणे
सदर रुग्णाला कुत्रा चावल्याची माहिती देण्यात आली होती. रुग्णाला घेऊन आलेले मित्र नातेवाईकांना बोलावण्यासाठी गेल्यानंतर रुग्णाने गोंधळ घातला. त्याच्यात रेबीजची लक्षणे होती, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्याला घाटीत पाठविले. त्याने मद्यपान केलेले होते, हे डॉक्टरांना का कळले नाही, यासह या सगळ्या प्रकाराची मंगळवारी चौकशी केली जाईल.
- डॉ. अर्चना भोसले, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक